मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.
शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!
राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या अभिनंदनाच्या प्रस्तावावेळी अबू आझमी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. मात्र नाव बदलून देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होत असले, तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावं बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावं बदलून नेमका काय संदेश दिला जातोय?, असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला.
अबू आझमी यांच्या या टीकेला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. अबू आझमी म्हणाले, मागच्या सरकारने शहरांची नाव बदलली, शहरांची नाव बदलून काय होणार नवीन शहर बसवा. त्यावर भास्कर जाधव म्हणाले, औरंगजेब हा अतिरेकी होता. त्याने आमच्यावर अत्याचार केले, म्हणून औरंगाबादचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही, इतकंच मला सांगायचं आहे, असं भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं.
पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली- मुख्यमंत्री
आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.