नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:50+5:302021-03-04T04:08:50+5:30
चर्चा रंगली; अध्यक्ष काेण, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष ...
चर्चा रंगली; अध्यक्ष काेण, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष नक्की कोण, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. याबाबत सरळसरळ दोन गट पडल्याने, नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय घडेल आणि हा एकंदर वाद संपुष्टात तरी कधी येणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी याआधी घेतलेल्या विशेष बैठकीत, नाट्य परिषदेच्या पुढील कार्यवाहीसाठी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांची बहुमताने निवड केली. मात्र त्यानंतर ही बैठकच अवैध असल्याचे मत नाट्य परिषदेकडून व्यक्त करण्यात आले. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी हेच असल्याचे परिषदेच्या मंडळींचे म्हणणे आहे. तर, प्रमुख कार्यवाह या नात्याने शरद पोंक्षे यांनी, नरेश गडेकर यांच्या अध्यक्षपदाला हरकत घेणारे पत्रच त्यांना पाठवले. त्यामुळे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, याचा फैसला सध्या अधांतरी आहे. या नाट्यात आता नाट्य परिषदेच्या विश्वस्तांपैकी एक असलेले शशी प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाल्याने, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाट्य अधिकच रंगले आहे.
* संस्था अधिक महत्त्वाची!
यासंदर्भात विश्वस्त शशी प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता, नियामक मंडळाने बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा प्रसाद कांबळी यांनी मान राखायला हवा, अशी भूमिका मांडली. त्यांना नियामक मंडळाच्या ३९ सदस्यांचा विरोध आहे; तर त्यांनी ते समजून घेऊन राजीनामा देणे योग्य ठरेल. वास्तविक, काम करण्याच्या बाबतीत प्रसाद कांबळी हे गुणी व्यक्तिमत्त्व आहे, मात्र त्यांनी इतर लोकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. आम्हाला नाट्यसंकुल पुन्हा सुरू करायचे आहे. कारण सगळ्यापेक्षा संस्था महत्त्वाची आहे, असेही शशी प्रभू यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------