Join us

अभिषेक घोसाळकर अन् मॉरिस भाईमध्ये नेमका काय वाद होता?; मित्रानं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:34 PM

अभिषेकचं नाव लोकांमध्ये खूप चांगले होते. आगामी काळात तो आमदार बनेल असं वातावरण होते असं मित्राने म्हटलं.

मुंबई - Abhishek Ghosalkar Murder Case ( Marathi News ) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या झाली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेकची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यातील वाद अखेर मिटण्याऐवजी कायमचा संपला. नेमकं या दोघांमध्ये काय वाद होते, राजकीय वर्चस्वातून ही हत्या झाली का, नेमकं हत्येमागे काय रहस्य आहेत असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या दोघांमधील काय वाद होता याबाबत अभिषेक घोसाळकर यांच्या मित्राने खुलासा केला आहे. 

लोकमतनं घेतलेल्या मुलाखतीत या मित्र नायर यांनी सांगितले की, हा वाद राजकीय वर्चस्वातून होता. अभिषेक घोसाळकर हा राजकीय कार्यकर्ता होता तर मॉरिसला राजकारणात यायचे होते. निवडणुकीचं वर्ष असताना या दोघांमधील वाद संपवण्यासाठी अभिषेक घोसाळकर मॉरिसला भेटायला ऑफिसला आला. मागील वर्षी या दोघांमध्ये वाद झाला होता.  एका प्रकरणात मॉरिसला पोलिसांनी अटक केली. तो जेलमध्ये होता. अभिषेकनं पीडित महिलेची बाजू घेतली. त्यातून वाद वाढला. तेव्हापासून दोघांमध्ये वैमनस्य तयार झाले असं त्यांनी सांगितले. 

तसेच अलीकडेच हे दोघे एकत्र आले. अभिषेकशी मैत्री करून मॉरिसनं त्याला विश्वासात घेतले. १-२ महिन्यापासून हे सुरू होते. अभिषेक घोसाळकर चांगला कार्यकर्ता होता. प्रत्येक गोष्टीत लोकांकडे धावून यायचा. मॉरिसलाही निवडणूक लढवायची होती. माझी एक बैठक मॉरिससोबत झाली होती. त्यात मला निवडणूक लढवायची आहे. मला आपकडून उभं करा, कुठल्याही पक्षाकडून उभे करा. मी निवडणूक लढणार असं बोलला. अरविंद केजरीवाल यांनी इथं यायला हवं असंही तो म्हणाला होता असं अभिषेक घोसाळकरच्या मित्राने सांगितले. 

त्यात अभिषेकचं नाव लोकांमध्ये खूप चांगले होते. आगामी काळात तो आमदार बनेल असं वातावरण होते. मॉरिसबद्दल खूप नाव खराब झाले होते. परंतु त्याला नेता व्हायचे होते, निवडणूक लढवायची होती. म्हणून अभिषेकसोबत त्याने मैत्री केली. मॉरिसला केवळ ओळख हवी होती. तो कुठल्याही पक्षात जायला तयार होता. मॉरिसने उद्धव ठाकरेंसोबत बॅनर्स लावले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले. तरीही सर्व पक्षाचे नेते त्याच्या बर्थ डेला इथे आले होते. राजकीय वर्चस्वातून ही घटना घडली आहे असं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :अभिषेक घोसाळकरगुन्हेगारीउद्धव ठाकरे