जीवघेणा अट्टाहास कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:33 AM2018-10-23T02:33:08+5:302018-10-23T02:33:17+5:30
शहर आणि उपनगरात विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करण्यासाठी ज्या स्कूलव्हॅन वापरल्या जातात;
मुंंबई : शहर आणि उपनगरात विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करण्यासाठी ज्या स्कूलव्हॅन वापरल्या जातात; त्यातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चित्र खुलेआमपणे सगळीकडे सारखे आहे. परंतु पालक-विद्यार्थी संघटना याबाबत काहीच बोलत नाहीत. पालकांना हे चित्र माहीत असूनही केवळ सोयीपोटी तेही काही बोलण्यास धजावत नाहीत; वाहतूक विभागाला तर इकडे लक्ष देण्यास वेळच नाही. परिणामी, छोट्या स्कूलव्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक धोक्यात असून, त्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यावर नुसतीच कारवाई करून भागणार नाही, तर यातून मार्ग काढण्याची गरज आहे.
‘लोकमत’ने स्कूलव्हॅनमधील चिमुरड्यांच्या वाहतुकीसंबंधीची वस्तुस्थिती ‘रिअॅलिटी चेक’द्वारे तपासली. साहजिकच त्यात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे. वेळ पाळता यावी म्हणून एक, दोन फेऱ्या मारणे या गोष्टी सर्रास केल्या जात आहेत. एकंदर काय तर शालेय विद्यार्थ्यांचा घरून शाळेपर्यंतचा आणि तिथून परतीचा प्रवास आता जीवघेणा ठरत आहे. स्कूलव्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची कोंबाकोंबी करून त्यांची असुरक्षित वाहतूक कोणत्याही अडवणुकीशिवाय केली जात असल्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे. आसन व्यवस्थेशी छेडछाड करून बस व व्हॅनमध्ये असुरक्षितपणे वाहतूक केली जाते. शाळा व्यवस्थापन, आरटीओकडून अवैध प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा केला जात असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांचे फावले आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून बहुतांश छोट्या वाहनांचे चालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. असुरक्षित शालेय वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी वाढत असल्याने शहरात शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
(संकलन : सचिन लुंगसे, चेतन ननावरे, सीमा महांगडे, गौरी टेंबकर)
>वाहतूक पोलिसांची डोळेझाक
भायखळा/माझगाव : भायखळ्यातील मसिना रुग्णालयासमोरील समा इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलव्हॅन चालकांकडून वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. सात आसनी क्षमता असलेल्या छोट्या स्कूलव्हॅनमधून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र होते. महत्त्वाची बाब म्हणजे मसिना रुग्णालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने डावे वळण घेऊन गाडी खडा पारसी रोडवरून जे.जे. रुग्णालय सिग्नलपर्यंत जाताना मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून गेली. तरीही व्हॅन अडवण्याचा किंवा कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा प्रयत्न दिसला नाही. या व्हॅनव्यतिरिक्त काही खासगी वाहनांतून विनापरवाना व वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसले. याशिवाय माझगाव येथील सेंट पीटर्स स्कूल, सेंट मेरीज या शाळांमधील विद्यार्थ्यांचीही नियमबाह्य वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलीस आणि व्हॅनचालकांमध्ये साटेलोटे
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी चारचाकींसह नियमांचे उल्लंघन करणाºया छोट्या स्कूलव्हॅनवर कारवाई करण्यासाठी वारंवार वाहतूक पोलिसांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलीस आणि व्हॅनचालकांमध्ये साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच सर्रासपणे मुंबई शहरासह उपनगरात बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. छोट्या स्कूलव्हॅनमध्ये सात विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई आहे. तसेच वाहतूक केल्या जाणाºया विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षांहून अधिक नसावे, असेही नियमावली सांगते. तरीही सर्व नियमांचे उल्लंघन करत स्कूल व्हॅनचालक विद्यार्थ्यांना सामानाप्रमाणे व्हॅनमध्ये कोंबतात. यासंदर्भात शाळा प्रशासनही पालकांवर जबाबदारी ढकलते. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाºया स्कूलव्हॅन चालकांचे व मालकांचे नुकसान होत आहे. - अनिल गर्ग, अध्यक्ष, एज्युकेशनल टूर आॅपरेटर्स असोसिएशन
कर्मचाºयांच्या पगारासाठी विद्यार्थी दावणीला
मालाड : सुरुवातीला निव्वळ तीन ते चार मुलांना स्कूलव्हॅनने नेले आणि आणले जात होते. मात्र आता सोबत महिला सहकारी ठेवणे बंधनकारक करण्यात आल्याने नंतर मुलांची संख्या वाढविण्यात आली. असे नाही केले तर महिलेचा पगार देणे परवडत नाही. सध्या बांगुरनगरपासून सुंदरनगरपर्यंत लहान मुलांची ने-आण केली जाते. सहा ते सात लहान मुलांना गाडीत बसविले जाते. मात्र, मोठ्या वर्गातील निव्वळ तीन ते चारच मुले गाडीत बसविली जातात. येथे गाडी शाळेच्या गेटवर नेण्याची परवानगी नाही. कारण शाळेच्या बसला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गाडी काही अंतरावर थांबवून मग मुलांना एकामागोमाग एक शाळेत आणले जाते आणि शाळेतून पुन्हा इच्छित स्थळी सोडले जाते. यासाठी एका मुलामागे बाराशे ते पंधराशे रुपये घेतले जातात.
विद्यार्थ्यांची कोंबाकोंबी
कुर्ला/विद्याविहार : कुर्ला पश्चिमेकडे मायकल आणि कार्तिका, तर विद्याविहार पश्चिमेकडे होलीक्रॉस या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तिन्ही शाळांमधील ज्युनिअर आणि सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना छोट्या स्कूलव्हॅनलगतच्या परिसरातून शाळेत सोडतात. या व्हॅनला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जात नाही. महत्त्वाचे म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्गावरच छोट्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांना उतरविले जाते. मुळातच या रस्त्यावर कायम दुरुस्तीची कामे सुरू असतात. प्रत्येक स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविले जाते. चालकाच्या बाजूच्या सीटवर तीन विद्यार्थी, मधल्या भागात समोरासमोरील सीटवर चार-चार; असे आठ विद्यार्थी आणि उभे किमान चार, असा विद्यार्थ्यांचा भरणा या व्हॅनमध्ये केला जातो. महत्त्वाचे म्हणजे यातील काही स्कूल व्हॅन एक नव्हे तर किमान दोन फेºया करतात.
पालकांनी आपली सोय पाहू नये
अवैध आणि असुरक्षित वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरिता आरटीओ विभागाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांनी अशा स्कूलव्हॅनवर निर्बंध आणले असता, पालकांना स्कूलबस किंवा स्वत: विद्यार्थ्यांची ने-आण करणे हाच पर्याय असेल. पालक-शिक्षक बैठकांमध्येही या विषयावर पालकांची जनजागृती केली जाते. मात्र स्वस्त दर आणि सोय पाहता पालक हा अवैध पर्यायच निवडत आहेत.
- अरुंधती चव्हाण, अध्यक्षा,
पालक-शिक्षक संघ