युतीचं भवितव्य काय? चंद्रकांत पाटील यांनी केले मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:28 PM2019-07-21T13:28:30+5:302019-07-21T13:28:34+5:30
भाजपा आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगणारी वक्तव्ये करण्यात येत असल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. त्यातच दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगणारी वक्तव्ये करण्यात येत असल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता युती करणे आवश्यक आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गेल्या काही काळात भाजपाची ताकद वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. लोकसभेत भाजपामुळे शिवसेनेचे उमेदवार भाजपामुळे निवडणून आले आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता युतीची काय गरज अशी विचारणा होत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत युती होणे आवश्यक आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले असते तर आपल्याला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या. आताही त्यांचे मतदान फार कमी झालेले नाही. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढले तर दोघांनाही मिळून 170 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या जरतरच्या गोष्ठी झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधीच धसका घेतल्याने ते एकत्रच लढणार आहे. आजच्या परिस्थितीत ते वेगळे लढले तर त्यांच्या फारतर प्रत्येकी 10 जागा येतील.'' असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
''भाजपा आणि शिवसेना हे एकाच विचारधारेचे पक्ष आहे. दोघेही एकाच घरातील भावंडे आहे. त्यमुळे काही मतभेद असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी सर्व 288 जागांची तयारी करावी. कारण आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकल्या तरी आपल्याला मित्रपक्षांची गरज पडेल. त्यामुळे मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी सर्व जागांवर चोख तयारी असणे आवश्यक आहे.'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विशेष कार्यसमिती बैठकीत, माजी प्रदेशाध्यक्ष श्री @raosahebdanve नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatil यांना भाजपाचा ध्वज प्रदान करताना. #JPNaddaInMumbaipic.twitter.com/VXVna9U5tM
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 21, 2019
यावेळी लोकसभा निवडणुकीत वंचितचा फॅक्टर युतीच्या विजयात महत्त्वाचा ठरल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला. नरेंद्र मोदींचे नेतृत्व, बूथ आणि पन्नाप्रमुखांची मेहनत यामुळे भाजपाला विजय मिळाल्याचे त्यांनी सांगितले.