मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेला. २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. मात्र, ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले? त्या नेमक्या कारणाचा मागोवा घेण्यासाठी केईएम रुग्णालयातील जखमींशी ‘लोकमत’ने लाइव्ह संवाद साधला आहे. या संवादातून केवळ अफवा पसरल्या अन् काही क्षणांत हाहाकार माजला असेच दिसून आले आहे....म्हणून श्वास सुरू राहिलापरळच्या गारमेंट कंपनीत कामाला आहे. कामासाठी मुंबईत शिफ्ट झालो. नेहमीप्रमाणे कामावर जात असताना त्या पुलावर होतो. नेमके कारण कळायच्या आत आणि कुणाला विचारण्याच्या आधीच माणसांची गर्दी अंगावर कोसळली. बाहेर पडायचा प्रयत्न सुरू होता, पण काहीच शक्य झाले नाही. पुलाच्या बाहेरच्या बाजूला तोंडाचा भाग राहिल्याने सुदैवाने श्वास सुरू राहिला. सोशल मीडियावरच्या फोटोंमध्ये मी दिसत आहे, पण ते फोटो आता नजरेच्या समोरही नकोसे वाटत आहेत.- पीयूष ठक्करपूल कोसळल्याच्या अफवेने धावाधाव२९ सप्टेंबरला सकाळी पाऊस खूप होता. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी सगळेच पुलाचा आधार घेऊन थांबले होते. मात्र, त्या वेळी गर्दी नियंत्रणात होती. त्यानंतर, पाचएक मिनिटाने परळ येथील स्थानकावर लोकल आली आणि माणसे वाढली. तेव्हाच कुणीतरी पूल एका बाजूने कोसळत असल्याचे सांगितले आणि एकच धावाधाव झाली. परळला गेली कित्येक वर्षे कार्यालय असल्याने ये-जा होते. पण परिस्थिती बदलत नाही. या परिस्थितीला यंत्रणा जबाबदार आहे. तो भयानक क्षण कायम मनात राहील. - नरेश कांबळे...अन् गर्दीचा लोंढा अंगावर आलामाझ्याकडे छत्री नव्हती. त्यामुळे मी जिन्यावरच थांबले होते. त्या वेळेस दोन लोकल एकत्र आल्याने गर्दी वाढली आणि अचानक सगळे धावपळ करायला लागले. मी आजूबाजूच्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला काय झाले ते सांगा, पण कुणी काहीच सांगत नव्हते. जो-तो जीव मुठीत घेऊन धावत सुटला. चेंगराचेंगरी झाली. माझ्या मागे असलेल्या व्यक्ती माझ्यावर पडल्या. त्यामुळे माझ्या छातीवर जोर आल्याने माझा श्वास गुदमरला. कपडेसुद्धा फाटले होते.- रेश्मा कदमथोडक्यात बचावलोमी एल्फिन्स्टनलाच राहतो. दादरला निघालो होतो. बरेच प्रवासी पुलावरून उतरण्यासाठी ताटकळत उभे होते. हळूहळू वर चढण्याच्या प्रयत्नात असताना माणसे थेट अंगावर कोसळू लागली. काही समजण्याच्या आतच आरडाओरडा सुरू झाला. त्यात मीही दबलो, पण या सगळ््यात पुलाच्या एका बाजूला घट्ट पकडून उभा राहिल्याने थोडक्यात बचावलो. परंतु वेदना अजूनही कायम आहेत. त्या घटनेने मनावर कायमचा ओरखडा ओढला आहे. भविष्यात काही दिवस तो पूल पाहणे माझ्यासाठी भीतिदायक ठरणार आहे. - सुनील मिश्राधावपळ सुरू झाली अन् अपघात झालाउत्तर प्रदेशहून कामाच्या शोधात आम्ही दोन भावंडांनी मुंबई गाठली आणि मग एल्फिन्स्टनच्या पुलावरचा प्रवास गेली कित्येक वर्षे रोजचा बनला आहे. या दुर्घटनेत एका पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्या दिवशी पुलाच्या केवळ ४-५ पायºया उतरायच्या शिल्लक असताना अचानक माणसे एकमेकांच्या अंगावर पडू लागली. काय झाले काहीच कळले नाही. जाग आली ती थेट रुग्णालयात आल्यानंतर.- जितेंद्र पटेलशॉर्टसर्किटमुळेझाली पळापळगेली अनेक वर्षे या पुलावरून प्रवास करत आहे. त्या दिवशी रोजच्या वेळेप्रमाणे मी त्या पुलावर पोहोचले आणि पूल उतरत होते, तेवढ्यात मागून कुणीतरी शॉर्टसर्किट झाल्याचे सांगितले. त्यामुळे पळापळ झाली. उतरत असताना अचानक पाय दुमडले आणि मी तशीच पायºयांवरून घसरले. त्यामुळे कंबर आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मनात भीतीने घर केले आहे. - अर्पणा सावंतजखमींचे होणार समुपदेशनएल्फिन्स्टन दुर्घटनेतील जखमींवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांच्या शरीराप्रमाणेच मनावरही मोठे आघात झाले आहेत. जखमींपैकी काही जणांच्या मनात रेल्वे प्रवासाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे, तर काहींच्या डोळ्यांसमोरून अजूनही तो भीषण अपघात जात नाही.. काही जण ‘त्या’ अपघाताच्या काळ्या आठवणी घेऊन रात्रभर जागेच असतात. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरच जखमींचे समुपदेशन करण्यात येणार आहे.केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांच्यासह १० डॉक्टरांची चमू यासाठी समुपदेशन करणार आहे. यासंदर्भात डॉ. शुभांगी पारकर यांनी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपेंशी चर्चा केली असून, सोमवारपासून या जखमींचे समुपदेशन सुरू होणार असल्याचे डॉ. सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दुर्घटनेतील जखमींच्या डोळ्यांसमोर वारंवार ती घटना येते. त्यामुळे त्यांच्या भविष्यावर याचे गंभीर परिणाम उमटताना दिसू शकतात. यापूर्वी अशा काही केसेस हाताळल्या आहेत. मानसिक त्रासामुळे त्या व्यक्तीसह कुटुंबावरही त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत बºयाचदा हे रुग्ण त्या ठरावीक ठिकाणापासून पळ काढतात, लोकांशी बोलणे कमी होते. किंवा त्या रुग्णांच्या मनात दुर्घटनेची कायमची भीती बसते. अशा रुग्णांवर वेळीच उपचार न केल्यास त्यांना ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर’ हा मानसिक आजार होण्याची शक्यता असते, अशी माहिती डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.रुग्णांच्या समुपदेशन थेरपीमध्ये प्राथमिक पातळीवर केवळ रुग्णांशी गप्पा मारल्या जातात. त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे जाणून घेऊन पुढील उपचारांची दिशा ठरविली जाते. या प्रक्रियेला ‘सर्पोटिव्ह सायको थेरपी’ म्हटले जाते, असे डॉ. पारकर यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात १९ जखमींवर उपचार सुरू आहेत.
‘त्या’ दिवशी नेमके काय घडले?, तो भयानक क्षण काळजात कायम घर करून राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:42 AM