Join us  

हॉटेल 'ब्लू सी'मध्ये काय ठरलं होतं? संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 9:50 AM

अमित शहांचं वक्तव्य असत्याला धरून आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. याउलट सन 2014 पासून भाजपने पावलोपावली हिंदुत्वाचा अवमान केला आहे.

ठळक मुद्दे सत्तेचा वाटा 50-50 असा ठरला. पॉवर शेअरींग म्हणजे सत्तेचा वाटा निम्मा असतो. त्यामध्ये, मुख्यमंत्रीपदही येते, असे म्हणत राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांचे विधान असत्याला धरुन असल्याचे म्हटले. 

मुंबई - महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील सभेत केली होती. अमित शहांच्या या टिकेला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. शहांचे हे विधान असत्याला धरुन आहे, असा पलटवार राऊत यांनी केला. 

अमित शहांचं वक्तव्य असत्याला धरून आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. याउलट सन 2014 पासून भाजपने पावलोपावली हिंदुत्वाचा अवमान केला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी वरळीच्या सी ब्लू हॉटेलमध्ये पुनश्च हरिओम करण्याचा, पुन्हा युती करण्याचा एक सोहळा पार पडला. त्यावेळी दोघांकडून एक शब्द देण्यात आला. सत्तेचा वाटा 50-50 असा ठरला. पॉवर शेअरींग म्हणजे सत्तेचा वाटा निम्मा असतो. त्यामध्ये, मुख्यमंत्रीपदही येते, असे म्हणत राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांचे विधान असत्याला धरुन असल्याचे म्हटले. 

105 आमदारांनी राजीनामा द्यावा

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानच अमित शहांनी शिवसेनेला दिले आहे. त्या आव्हानला प्रति उत्तर देताना राऊत यांनी भाजपच्या 105 आमदारांनी राजीनामा द्यावेत, असे म्हटले आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचे 105 आमदार निवडून आले नाहीत. शिवसेनेच्या पाठिंब्याचा त्यामध्ये वाटा आहे, भाजपने हिंमत असेल तर 105 आमदारांचा राजीनामा द्यावा, असेही राऊत यांनी म्हटले. 

शिवसेनेनं विश्वासघात केला - शहा

शिवसेनेनं भाजपशी विश्वासघात केला आणि ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी पुण्यात केला. शहा यांनी दोन वर्षांनी या घटनेचा खुलासा केला आहे. तसेच, हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे खुले आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.  

टॅग्स :अमित शाहशिवसेनासंजय राऊतभाजपापुणे