Join us

हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:15 AM

हरयाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने मविआ नेत्यांनी काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला विचारायचे आहे की, आता कसं वाटतंय? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हरयाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरयाणात जे घडले तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.

हरयाणातील विजयाबद्दल भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष जिंकला हे महत्त्वाचे नसून तेथील निवडणुकीमुळे जम्मू-काश्मीरबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार चपराक बसली आहे.

हरयाणामध्ये अग्निवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. खेळाडूंना पुढे करून रान पेटविण्यात आले. वेगवेगळ्या समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा अधिक मोठे यश भाजपला दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधी यांना हरयाणाच्या जनतेने पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातही विजय मिळविण्याचा निर्धार 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हरयाणा सारखाच विजय मिळविण्याचा निर्धार केला पाहिजे. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाई गिरकर, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

‘भोंग्यांना विचारतो, आता कसं वाटतंय?’

हरयाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने महाराष्ट्रातील महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. या नेत्यांना, सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला आता मला विचारायचे आहे की, आता कसं वाटतंय? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४देवेंद्र फडणवीसभाजपा