राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:50 PM2024-03-19T18:50:46+5:302024-03-19T18:54:35+5:30
दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली.
MNS Bala Nandgaonkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवनवी राजकीय समीकरणे उदयास येत असल्याचं चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नवी दिल्ली येथे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केल्याने निवडणुकीआधी राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे.
"मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसेला महायुतीकडून ज्या जागा मिळतील त्यातील एका जागेवर बाळा नांदगावकर हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. याबाबतही नांदगावकर यांनी खुलासा केला आहे.
स्वत:च्या उमेदवारीबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, "मी याआधी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी सांगितलं तर मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कानावर आदेश पडला की त्यानुसार कृती करण्याची सवय आहे. त्यामुळे राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ. मी उद्या पुन्हा राजसाहेबांसोबत चर्चा करणार आहे," असं नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
मनसेला कोणत्या जागा मिळण्याची शक्यता?
राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मनसेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई हा मराठीबहुल भाग आहे. याठिकाणी मनसेचीही ताकद आहे. सध्या इथं अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आहेत. गेल्या २ टर्मपासून ते महायुतीकडून उमेदवार होते. मात्र यावेळी ठाकरेंनी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर या भागात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. त्यात आता या जागेवर मनसेचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
मनसेला मिळणारी दुसरी जागा ही ग्रामीण भागातील असू शकते. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याबाबत विचार सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेले अमित ठाकरे हे उभे राहावेत अशी भाजपाची मागणी होती. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.