सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काय झाले?
By admin | Published: January 29, 2017 03:36 AM2017-01-29T03:36:07+5:302017-01-29T03:36:07+5:30
मुलुंडचे अग्रवाल रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तो कागदावरही उतरला आहे. मात्र हे सुपर स्पेशालिटी कधी होणार, असा प्रश्न प्रभाग
मुंबई : मुलुंडचे अग्रवाल रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तो कागदावरही उतरला आहे. मात्र हे सुपर स्पेशालिटी कधी होणार, असा प्रश्न प्रभाग क्रमांक १०७ मधील मतदारांना पडला आहे.
तीन प्रभाग मिळून १०७ हा नवीन प्रभाग तयार करण्यात आला आहे. यात जुने प्रभाग क्र. १०२, १०३ व ९८ चा समावेश आहे. नव्या फेररचनेमुळे आणि आरक्षणामुळे हा प्रभाग बदलला गेला. मात्र काही सूचना आणि हरकतींमुळे याची थोडीफार पुनर्रचना करण्यात आली. मुलुंड उपनगराचा हा मध्य प्रभाग असल्याने येथे झोपडपट्टी विभाग, एस.आर.ए. प्रकल्प आणि खासगी गृहनिर्माण संकुले समप्रमाणात आहेत. भाजपाचा गड मानण्यात आलेला हा प्रभाग आता महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे सेना, भाजपा, राष्ट्रवादी व मनसे पक्षातील अनेक इच्छुक महिला उमेदवारांनी येथे आपले अर्ज भरल्याचे समजते. तसेच काही नेत्यांनी आपल्या पत्नीसाठी प्रचार करावयास सुरुवात केली आहे.
मुलुंडमधील एकमेव मोठे पालिका रुग्णालय म्हणून अग्रवाल रुग्णालयाचे नाव घेतले जाते. हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी होईल, असे प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी मुलुंडकरांना आश्वासन दिले. परंतु ते कधीच पाळले गेले नाही. विद्यमान नगरसेवकाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी मंजुरी घेतली आहे. मात्र ते कसे आणि कधी होणार, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. त्याचप्रमाणे अपना बाजार येथील रेल्वे पादचारी पूल अत्यंत दयनीय झाला आहे. मात्र अद्यापही त्याचे काय झाले, याचे उत्तर मात्र मिळालेले नाही. (प्रतिनिधी)
अशी आहे प्रभागरचना
हा प्रभाग उत्तरेकडे आर.पी. व एम.जी. रोड, पूर्वेकडे एस.एल. रोड, दक्षिणेकडे टी व एस सीमा तर पश्चिमेकडे पी.के. रोड, एल.बी.एस. रोड अंतर्गत सीमा बंदिस्त केलेला आहे. या प्रभागात नाहूर गावठाण, मुलुंड बस डेपो, सेंट पायस कॉलनी आदी प्रमुख वस्तींचा भरणा आहे.
महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डात जुन्या प्रभाग कमांक १०३ मधून नाहूर, गांधीनगर, हिरानगर, केशवपाडा, साल्पा देवी विभागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे झोपडपट्टी, मध्यमवर्गीय व व्यापारी बहुसंख्य मतदारांचा हा प्रभाग बनलेला आहे.