माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुंड मॉरिस नऱ्होना याने अभिषेक घोसाळकर त्याच्या कार्यालयात आले असताना मॉरिस याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा जागीस मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतर घटनास्थळी नेमकं काय घडलं याबाबतची धक्कादायकह माहिती तिथे उपस्थित असलेल्या एका महिला शिवसैनिकाने दिली आहे.
त्या म्हणाल्या की, मॉरिस नऱ्होना याने अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये कशाला जायचं, असं आमचा प्रवीण नावाचा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर यांना म्हणाला. मात्र दोन मिनिटांसाठी जाऊन येऊया, म्हणत अभिषेक घोसाळकर हे त्याच्यासोबत गेले. मॉरिस याने तिथे अभिषेक घोसाळकरांसोबत फेसबूक लाईव्हसुद्धा केले. हे फेसबूक लाईव्ह सुरू असताना कार्यालयाचं शटर बंद केलेलं होतं. तसेच तिथे घोसाळकर यांच्यासोबत प्रवीण आत होता. आम्ही बाहेर उभे होतो.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या घोसाळकर यांना जेव्हा धरून बाहेर आणलं आणि खाली ठेवलं तेव्हा आम्ही धावाधाव केली. रिक्षावाले त्यांना रिक्षात घेण्यासही तयार नव्हते. अखेर एका रिक्षावाल्याने त्यांना रिक्षात घेतलं. त्यानंतर आम्ही रिक्षातून त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो, अशी माहिती या महिला शिवसैनिकाने दिली.
त्याआधी महिलांनी सगळ्यांनी एकत्र असं आम्हाला सांगण्यात आलं. काय काम आहे हे सांगितलं नव्हतं. आम्ही सगळे जमलो तेव्हा ते म्हणाले की मॉरिसच्या कार्यालयाजवळ साड्या वाटप होणार आहे. तेव्हा आम्ही म्हणालो की, तो आम्हाला कशाला साड्या देतोय, गोरगरिबांना साड्या द्याव्यात. आम्ही अर्ध्या वाटेत गेलो तेव्हा त्याने आम्हाला पुन्हा शाखेत बसण्यास सांगितले. मात्र अभिषेक घोसाळकर हे मॉरिसच्या कार्यालयाजवळ गेले तेव्हा काही वेळ लाईट गेली होती. तेव्हा आम्हाला संशय आला. त्यावेळी त्याने काहीतरी प्लॅन आखला असावा. कारण तेव्हा अभिषेक घोसाळकर हे बाहेरच उभे होते, अशी माहितीही या महिला शिवसैनिकाने दिली.