या स्मारकांचे काय झाले? उदंड घोषणा, जीआरही निघाले; गतिमान प्रशासनाने रखडवले बांधकाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:39 AM2019-09-09T02:39:13+5:302019-09-09T06:16:03+5:30
पर्यावरणाच्या मुद्द्यावर थांबले शिवस्मारकाचे काम; मात्र गतिमान प्रशासनाने रखडवले अनेक ठिकाणच्या वास्तूंचे बांधकाम
मुंबई: मुंबईनजीक अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक सध्या न्यायालयाच्या कचाट्यात अडकले आहे. स्मारकासाठी चुकीच्या पद्धतीने पर्यावरण विषयक परवानग्या देण्यात आल्याचा आरोप करत स्मारकाचे काम थांबविण्याची मागणी मुंबईतील काही पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ११ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने राज्य सरकारला काम थांबविण्याचे निर्देश दिले. यानंतर आठवडाभरातच सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम थांबविण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर स्मारकाचे काम पूर्णपणे थांबले असून सध्या सर्वोच्च न्यायालयात सध्या ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.
शिवरायांचे जगातील सर्वात उंच आणि भव्य असे स्मारक बांधण्यास राज्य सरकार कटीबद्ध असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या मुहुर्तावर शिवनेरी गडावरील कार्यक्रमात केली होती. ३,६४३ कोटींचा हा प्रकल्प २०२२-२३ पर्यंत तयार होणे अपेक्षित होते. शिल्पकार राम सुतार यांच्याकडे शिवरायांच्या शिल्पाचे काम सोपविण्यात आले आहे.
स्मारकाचा आरखडा
शिवरायांचा भव्य पुतळा, उद्याने, फूडकोर्ट, संग्रहालय, प्रदर्शनी, रूग्णालय आणि हेलिपॅडसह अत्याधुनिक सुविधा या स्मारकस्थळी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये वाजतगाजत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम केला होता.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम सुरू
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्याबाबत मुंबई महापालिका आणि स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान अलीकडेच करार झाला. त्यानुसार महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी ११ हजार ५५१ चौरस मीटर जागा स्मारक न्यासाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या स्मारकात उलगडला जाणार आहे. राज्य सरकारने महापौर बंगला येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचबरोबर पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानगी यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष स्मारकाच्या रचनेचे काम सुरू झाले आहे.
बाबासाहेब आंबेडकर स्मारक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल परिसरातील सुमारे साडे बारा एकर जागेवर ७५५ कोटी रुपये खर्चाचे स्मारक बांधण्यात येत आहे. जागेचे हस्तांतरण पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. येत्या तीन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा निर्धार आहे. शिल्पकार राम सुतार हे डॉ. बाबासांहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारत आहेत. या स्मारकात ग्रंथालय, संशोधन केंद्र, सभागृह, ध्यानसाधना केंद्र इत्यादी सुविधांसह महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या प्रतिकृतीचाही समावेश असेल.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक कागदावरच
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीने वातावरण ढवळून काढले होते. मुंबईत त्यांचे स्मारक असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यांचे निवासस्थान असलेल्या घाटकोपरच्या चिरागनगर येथे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने सप्टेंबर, २०१७मध्ये घेतला. मात्र तो निर्णय अजूनही कागदावरच आहे. अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडा किंवा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. या स्मारकामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारकाच्या सहा मजली इमारतीमध्ये १ हजार प्रेक्षकांसाठी सभागृह, ग्रंथालय, कलादालन आणि स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. स्मारक उभारण्यासाठी या परिसरातील रहिवाशांचे पुर्नवसन करणे गरजेचे आहे. पण त्या बाबत काहीच हालचाल नाही. तसेच, अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक गोल्डमिल येथे बांधण्यात यावे अशी मागणी काही संघटनांनी केलेली आहे.