ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवर येऊन आज (२६ मे) दोन वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त विविध माध्यमातून सरकारच्या कामगिरीचा लेखाजोगा मांडला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रात व राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेला व भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून त्यांनी सरकारच्या कामगिरीवर टिप्पणी करतानाच ' मोदी सरकारने काय केले व काय नाही याची बेरीज-वजाबाकी अवघ्या दोन वर्षात करणे बरोबर नसल्याचे सांगत मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी लोकांनी निवडले आहे. त्यामुळे जे काही सांगायचे ते शेवटच्या वर्षातच सांगणे उचित ठरेल' असे म्हटले आहे.
शिवसेना व भाजपा हे एकमेकांचे मित्रपक्ष असले तरी सत्तेच्या राजकारणावरून त्यांच्यात नेहमी धुसफूस सुरू असते, टोमणेही मारले जात असतात, मात्र असे असले तरी दोन्ही पक्षांची युती अद्याप कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आजच्या अग्रलेखातून सरकारबद्दल परखडपणे मतं मांडतानाच काही मुद्यांवर पंतप्रधान मोदींची पाठराखणही केल्याचे दिसते. तसेच गेल्या ६० वर्षांत सत्तेवर असलेल्या सरकारचे पाप धुण्यासाठी व विकास घडवण्यासाठी या सरकारल पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याचे सांगत ५ वर्षांनीच सरकारचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे :
- केंद्रातील मोदी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधानांचा मुक्काम स्वदेशी आहे की परदेशी ते पाहावे लागेल. पंतप्रधान बहुधा इराणला होते व तेथून ते आसाम येथे भाजप राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी गेले असावेत. पाच राज्यांच्या निवडणुकांत आसाम वगळता भाजपला तामीळनाडू, केरळ, प. बंगाल, पुद्दुचेरी या चार राज्यांत यश मिळाले नाही. या चारही राज्यांत पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रचाराची मोठीच आघाडी उघडली, पण आसामइतके मोठे यश मिळाले नाही. तरीही मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढण्याचा प्रयत्न केला. ते काही असले तरी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खमके आहे व ते एकहाती राजशकट हाकत आहेत. ते उत्तमप्रकारे कारभार हाकीत आहेत असे भाजप मंडळींचे मत आहे. जसे एक वर्ष झाले तसे दुसरे वर्षही सरले. पहिल्या व दुसर्या वर्षांत असे काय परिवर्तन झाले? त्यावर वायफळ चर्चा करण्यात अर्थ नाही.
- या दोन वर्षांत अनेक योजनांचा वर्षाव झाला. त्या योजनांचे पुढे काय झाले? मोदी सरकारने योजनांचा धडाका लावला असला तरी लोकांना फक्त ६ ते ७ योजनांचीच माहिती असल्याचे पाहणीत आढळून आले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ४० योजनांची घोषणा करण्यात आली. पण ‘जनधन योजना’, ‘स्वच्छ भारत योजना’, ‘पंतप्रधान ग्रामीण सडक योजना’ वगळता इतर योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. अर्थात, फक्त योजनांवर देश चालत नाही. आधीच्या सरकारने वेगवेगळ्या नावाखाली याच योजना राबवल्या होत्या व त्या योजनांत प्रचंड घोटाळे झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. ६० वर्षे देशाची सत्ता काँग्रेसच्या हातात होती व त्याकाळात सत्तेच्या दलालांचे अनेक अड्डे दिल्लीत व राज्याराज्यांत निर्माण झाले. मोदी यांनी ज्याप्रमाणे ‘अच्छे दिन’ची आशा दाखवली, त्याप्रमाणे ‘गरिबी हटाव’चे नारे देत काँग्रेसने गरीबांना जास्त गरीब व श्रीमंतांना जास्त श्रीमंत केले. काळा पैसा वाढला व परदेशी बँकांत ही लूट गेली. हा काळा पैसा परत आणू व जनतेच्या बँक खात्यात प्रत्येकी किमान १०-११ लाख जमा होतील असे वचन श्री. मोदी यांनी दिले होते. पण हे आश्वासन दोन वर्षांत पूर्ण झालेले नाही.
- दुसरीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या लाखाच्या घरात गेल्या. हे आत्महत्यांचे पाप मागच्या सरकारकडून पुढे आले. अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांचा मारा मोदी सरकारवर सुरूच आहे. दुष्काळ आहे, तसा कश्मीरात पाक अतिरेक्यांचा मारा थांबलेला नाही. नक्षलवाद, अतिरेकी हल्ल्यांत रोज आपल्या जवानांना वीरमरण येत आहे. तरीही पाकिस्तानशी चुंबाचुंबी सुरूच आहे. दोन वर्षांत भ्रष्टाचाराचा मोठा घोटाळा झाला नाही. पण महागाईचा आगडोंब जो उसळला आहे त्यावर पाणी टाकता आलेले नाही. मोदी यांचे विदेश दौरे या काळात अतोनात वाढले व त्यावर टीका होत असते. पण हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाला जगापासून अलिप्त व फटकून राहता येणार नाही. पाकिस्तान व चीनसारखे शेजारी ज्या राष्ट्रास लाभले आहे त्या देशाला जगात जास्तीत जास्त मित्र गोळा करीत फिरावे लागेल व मोदी तसे पायाला भिंगरी लावून म्हणा वा पंख लावून म्हणा फिरत आहेत. मोदी सरकारने काय केले व काय नाही याची बेरीज-वजाबाकी इतक्यात करणे बरोबर नाही. बिहार, प. बंगाल, तामीळनाडू वा केरळच्या जनतेने स्वतंत्र पद्धतीने ही गोळाबेरीज केली आहे. पण त्यास राष्ट्रीय धोरणांचे धागे जोडले जाऊ नयेत. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी लोकांनी निवडले आहे. त्यामुळे जे काही सांगायचे ते शेवटच्या वर्षातच सांगणे उचित ठरेल. सध्या तरी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत!