Join us

शिवाजी पार्कवर तिघे एकत्र येण्याने काय घडले?

By अतुल कुलकर्णी | Published: October 31, 2022 5:21 AM

लोकांनी दिवाळीत मुंबईत राहावे-फिरावे, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. असे उपक्रम राजकीय झेंड्यांच्या बाहेर ठेवले पाहिजेत.

- अतुल कुलकर्णी

क्सोफोनचा जनक अडॉल्फ सॅक्स यांचा जन्म बेल्जियममधील डिनांट या गावातला. त्यांची आठवण कायम राहावी म्हणून या गावाने असंख्य सॅक्सोफोन लावले. छोट्या आकारापासून ते दहा-वीस फूट उंचीपर्यंतचे सॅक्सोफोन पाहायला जगभरातील लोक या गावात आवर्जून जातात. टोरोंटोमध्ये किंगस्टन मार्केट, सेंट लॉरेन्स मार्केट, डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट अशा ठिकाणी रस्त्यांवर दुतर्फा असणाऱ्या घरांवर, दुकानांवर, मोठमोठ्या भिंतीवर, छोट्या बाकड्यांवर असंख्य चित्रं काढलेली दिसतात.

काही भागांत तर रस्त्यांवरही चित्रं काढलेली आहेत. लोक ती पाहायला आवर्जून जातात. अशा ठिकाणी लोक जातात, तेव्हा तिथे असणारी सर्व प्रकारची दुकानं भरभरून चालतात. तिथली वाहतूक व्यवस्था बहरते. तिथे गेल्यानंतर लोक आठवण म्हणून काही ना काही घेऊन येतात. संपूर्ण परिसराला त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते. त्या-त्या ठिकाणची सरकारं त्यासाठी प्रोत्साहन देतात, कारण त्यांना त्यातून कररूपाने पैसा मिळतो. असा काहीसा प्रकार दिवाळीच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्कवर पाहायला मिळाला. दरवर्षी दिवाळीत शिवाजी पार्कवर विद्युत रोषणाई केली जाते. आजूबाजूचे लोक ती बघतात. दोन-तीन दिवस फोटो काढून घेतात. पुन्हा आपल्या कामाला लागतात. यावर्षी पहिल्यांदा या विद्युत रोषणाईचे खऱ्या अर्थाने मार्केटिंग झाले. त्याला कारण ठरले तीन ज्येष्ठ नेत्यांचे एकत्र येणे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघे एकत्र आले. तिघांनी मिळून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा शुभारंभ केला. तीन नेते एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगळे चित्र झळकणार, अशा बातम्या सुरू झाल्या. त्यातून राजकीय चर्चा घडली. माध्यमांनी या भेटीला उचलून धरले. मात्र, त्याचा अप्रत्यक्ष फायदा वेगळ्याच पद्धतीने झाला. शिवाजी पार्कवरील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली. दिवाळीच्या तीन दिवसांत तर या भागातून चालणेही कठीण होते. दूर-दूरवर गाड्यांच्या रांगा लागल्या.

५० ते ६० हजार लोक सलग तीन-चार दिवस या भागात येत होते. पहिल्यांदा शिवाजी पार्कची विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकही आले. त्यामुळे इथे येण्या-जाण्यासाठी टॅक्सी, गाड्यांची गर्दी वाढली. त्यांना पैसे मिळाले. संपूर्ण परिसरात खाण्यापिण्याच्या अनेक हातगाड्या आल्या. त्यांनी व्यवस्थित पैसे कमावले. आजूबाजूच्या हॉटेल्सनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. राज ठाकरे यांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कदाचित ही अशी असेलही, मात्र तीन राजकीय नेते एकत्र आल्यामुळे या भागातल्या छोट्या माणसालाही वेगळ्या पद्धतीने चार पैसे कमावता आले.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी असे वेगवेगळे उपक्रम, उत्सव केले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे वेगळेपण दाखविणारे उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. मुंबईत फिल्मसिटी आहे. त्याठिकाणी लोक येतात. पण रखरखीतपणाशिवाय त्यांच्या वाट्याला काहीही येत नाही. परदेशी पर्यटक मुंबईचा वापर कायम प्लॅटफॉर्मसारखा करतात. मुंबई विमानतळावर उतरून ते राजस्थान, गोवा, औरंगाबाद अशा ठिकाणी जातात. ते मुंबईत थांबावेत, त्यांनी मुंबईत दोन दिवस घालवावेत, असे काहीही करण्याची इच्छाशक्ती आजवर एकाही राजकीय नेत्याने दाखवलेली नाही. राज ठाकरे यांनी या दीपोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर लोकांना मनसोक्त फटाके उडवू दिले.

पुढच्या वर्षी त्यांनी या उपक्रमाला जर आणखी वेगळे स्वरूप दिले, शिवाजी पार्कवर खाण्यापिण्याचे स्टॉल्स, खरेदी करण्यासाठीचे स्टॉल्स अशी व्यवस्था केली. राज्यभर याची व्यापक प्रसिद्धी झाली तर दिवाळीत लोकांना मुंबईत भेट देण्यासाठी एक उत्तम कारण मिळेल. दिवाळीत मुंबई बऱ्यापैकी रिकामी होते. त्यामुळे इथे येणाऱ्यांना हॉटेल्स स्वस्तात मिळतील. खाण्यापिण्याची चंगळ होईल. वेगळं काहीतरी बघितल्याचा आनंद मिळेल. त्यामुळे गेली दहा वर्षे सुरू असलेला हा दीपोत्सव मुंबईच्या लौकिकात भर घालणारा ठरेल. राज ठाकरे यांच्याकडे दृष्टी आहे, म्हणून ते अशा गोष्टी करतीलही... पण सरकारने या अशा उपक्रमांसाठी वेळ काढला पाहिजे. शांतपणे बसून नियोजन केले पाहिजे. असे उपक्रम राजकीय झेंड्यांच्या बाहेर ठेवले पाहिजेत.

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस