क्या हुआ तेरा वादा! मालमत्ता करमाफीवरून भाजपाने करु न दिली शिवसेनेला आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:52 PM2020-09-17T15:52:11+5:302020-09-17T15:53:22+5:30
सध्या ठाण्यात शिवसेना विरुध्द भाजप असा सामना चांगलाच रंगत आहे. भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याची आठवण करुन दिली आहे. तर दुसरीकडे भाजपची मंडळी केवळ स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे ठाण्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
ठाणे : ठाणेकरांना ५०० चौरस फूटापर्यंत घराचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या वेळी घोषणेची, भाजपने बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला आठवण करु न दिली आहे. शहरातील विविध भागात भाजपाने क्या हुआ तेरा वादा असा बॅनरद्वारे सवाल करीत मालमत्ता करमाफीवरून शिवसेनेने सुरू केलेल्या टाळाटाळीकडे ठाणेकरांचे लक्ष वेधले आहे. परंतु दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपची ही केवळ एक स्टंट बाजी असल्याचा आरोप केला आहे.
कोरोनाच्या आपत्तीत सापडलेल्या लाखो ठाणेकर कुटूंबांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून दिलासा देण्यास ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नकार दिला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटणार असल्याचे कारण दाखवून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात ५०० चौरस फूटांपर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आता सत्ता मिळाल्यानंतर वचननाम्याचा सोयिस्कर विसर पडून मालमत्ता कर माफ करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, याकडे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे शहरातील विविध भागात व बसथांब्यांच्या ठिकाणावर भाजपाने लावलेल्या क्या हुआ तेरा वादा बॅनरची गुरुवारी सकाळपासून नागरिकांमध्ये व सोशल मिडियात चर्चेचा विषय ठरली.
भाजपचे सर्वच नेते कोरोना काळात आपण काही तरी करतोय हे पक्षश्रेष्ठींना दाखविण्यासाठी हा विषय घेऊन आले आहेत. आम्ही ठाणेकरांना जो शब्द दिलेला आहे. तो आम्ही शब्द पूर्ण करुच, त्यासाठी भाजपने आम्हाला सांगायची गरज नाही. लोकांनी मागील १५ दिवसात २४२ कोटींचा मालमत्ता कर भरलेला आहे. याचा अर्थ नागरीक मालमत्ता कर भरण्याच्या बाजूने आहेत. भाजपने कितीही कितीही पत्रके काढली तरी त्याला ठाणेकरांनी दाद दिलेली नाही, हेच यातून सिध्द होत आहे. महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत हे मालमत्ता कर आहे. परंतु कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे तुर्तास मालमत्ता यावर विचार करणे शक्य नाही. परंतु आम्ही ठाणेकारांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. दुसरीकडे केंद्राने जीएसटीचा परतावा अद्यापही केलेला नाही. हेतुपुरस्पर ते हा परतावा करीत नाहीत. सध्या भाजपमध्ये केवळ स्टंटचा जमाना आला आहे, त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले आहे. भाजपची दुटप्पी भुमिकाही दिसून येत आहे, कोरोनाच्या काळात दुकाने उघडा, मदिंरे उघडा अशी मागणी केली जात आहे. परंतु तिकडे नागपुरमध्ये त्यांच्याच पक्षाचे महापौर जनता कर्फ्युची मागणी करीत आहे. याला नेमके काय म्हणावे असा सवालही पडला आहे.
(नरेश म्हस्के - महापौर - ठामपा)