अन्य देशांत आक्षेपार्ह ट्विटवर काय कारवाई होते? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:13 AM2020-12-09T03:13:43+5:302020-12-09T07:50:27+5:30
Mumbai High Court News : लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली किंवा ट्विट केले तर तिथे काय कारवाई करण्यात येते? याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले.
मुंबई : लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली किंवा ट्विट केले तर तिथे काय कारवाई करण्यात येते? याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल नवी मुंबईच्या सुनैना होले हिच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा रद्द करण्यासाठी सुनैना हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. सुनैना हिने कोणताही गुन्हा केलेला नाही. तिने केवळ एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तिने स्वतः तयार केलेला नाही, असा युक्तिवाद सुनैना हिचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी खंडपीठापुढे केला. सुनैना हिने कोणताही समाज, जाती आणि धर्माबाबत द्वेष करणारी कोणतीही पोस्ट केली नाही, असे चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले.