Join us  

असे काय बदलले की, कोस्टल रोडचे बिल १०० कोटीने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:24 PM

कोंडीतून सुटका होण्यासाठी बांधत आहे प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी, यासाठी पालिका मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर कोस्टल रोड बांधत आहे. मात्र, या कोस्टल रोडच्या खर्चात १०० कोटींची वाढ झाली आहे. बांधकामातील बदलामुळेच ही वाढ झाली आहे.

मुंबई  प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडच्या खर्चात वाढ झाली आहे.  कोस्टल रोडच्या पॅकेज-२ च्या कामात बदल करण्यात आला असून, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून वरळी सीलिंकजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्यात आले होते.  कोळी समाजाच्या  मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.  वरळी येथील खांब क्रमांक ७ आणि ९ मधील खांब क्रमांक ८ काढून टाकला आहे.

७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण

विशेष म्हणजे पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकूण प्रकल्पाचे ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्णही झाले आहे, तर उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

समुद्राचे पाणी शिरणार नाही

समुद्राचे पाणी कोस्टल रोडच्या खालून पुन्हा मुंबईत शिरू नये, यासाठी     १५ ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर या फ्लड गेटची रुंदी अडीच पटीनी वाढविल्याची माहिती प्रकल्पाच्या अभियंत्यांनी दिली.

 ...असा आहे कोस्टल रोड 

  • रस्त्याची लांबी - १०.५८ कि. मी. 
  • मार्गिका संख्या - ८ (४ ४), (बोगद्यांमध्ये ३ ३) 
  • भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी – ४.३५ कि. मी. 
  • पुलांची एकूण लांबी – २.१९ कि. मी. 
  • बोगदे – दुहेरी बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ कि. मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

८० किमी प्रतितासच्या वेगाने जाता येणार

कोस्टल रोड बांधून पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून ८० किमी प्रतितास या वेगाने जाता येणार आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी ६० किमी प्रतितास या वेगाने गाड्या धावतील. याशिवाय या मार्गावर बससाठी वेगळा बीआरटी मार्ग असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई