आमदार म्हणून तुम्ही काय केले? माहुलकरांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 01:09 AM2019-12-19T01:09:40+5:302019-12-19T01:09:48+5:30
शुद्ध हवा, पाण्याचा प्रश्न पेटला : प्रकाश फातर्पेकर, पराग शहा, राम कदम, दिलीप लांडे, रमेश लटके बोलणार कधी?
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे़ किमान आता तरी या अधिवेशनात माहुल प्रकल्पग्रस्तांच्या विषयाला हात घालून सर्वपक्षीय आमदारांनी माहुल प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, असे म्हणणे माहुल प्रकल्पग्रस्तांनी मांडले आहे.
अंधेरी पूर्व, साकीनाका, विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील प्रकल्पबाधितांना येथे स्थलांतरीत करण्यात आले़ स्थानिक आमदारांबाबत प्रकल्पग्रस्तांनी माहिती देताना सांगितले की, चेंबूर विधानसभेत माहुलचा समावेश होतो. आजघडीला येथे शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत. घाटकोपर पश्चिमेला पूर्वी भाजपचे राम कदम आमदार आहेत. घाटकोपर पूर्वेला पूर्वी भाजपचे पराग शहा आमदार आहेत. चांदिवली येथे पूर्वी काँग्रेसचे नसीम खान आमदार होते, आता शिवसेनेचे दिलीप लांडे आमदार आहेत. अंधेरी पूर्व येथे पूर्वी शिवसेनेचे रमेश लटके आमदार आहेत. सदर आमदारांनी माहुल प्रकल्पग्रस्तांसाठी काहीच केले नाही. या आमदारांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीतरी कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
प्रकल्पग्रस्तांनी निवडणूकांपूर्वी स्थानिक आमदारांची भेट घेतली होती. आमदारांनी केवळ आश्वासने दिली. ठोस अशी कृती करण्यात आली नाही, अशी माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली.
आंदोलने करूनही पदरी निराशाच
माहुल प्रकल्पबाधितांनी घाटकोपर पश्चिम आणि कलिना विधानसभा क्षेत्रात आंदोलन केले होते. माहुल नको, आता दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी मागणी करत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, हा मुद्दा मांडला होता. पण झाले काहीच नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना न्यायालयात न्याय मिळूनसुद्धा प्रत्यक्षात मात्र तो मिळू शकत नसल्याने हताश होऊन, पूर्वी ज्या भागात ते राहायचे त्या भागातील आमदारांना या प्रश्नावर घेरण्याचा व आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; आणि आंदोलनेही झाली होती. आमदार म्हणून त्यांनी आमच्यासाठी काय केले? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला होता.