मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी गुढ झाला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या महाशिवआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत शिवसेना आणि सत्तास्थापना या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं पवारांनी सांगितले. त्यानंतर, सोशल मीडियावरून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरील मिम्सही व्हायरल झाले आहेत. पवारांच्या नादी लागलं की असंच होतं. तसेच, पवारांनी शिवसेनेला अऩ् संजय राऊतांना फसवलं अशा आशयाचे जोक्स, मिम्स ट्विटर अन् फेसबुकवर व्हायरल होत आहे. यंदाच्या निवडणुकीतून काय शिकलात ?... प्रेयसीच्या नादात संसार मोडायचा नाही.... असे जोक्स व्हायरल होत आहेत.
संजय राऊत यांनाच मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलंय. गेल्या 20 दिवसांपासून शिवसेनेची भूमिका सांगताना, भाजपावर त्यांनी बाण सोडले आहेत. त्यामुळे राऊत हेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. तर, संजय राऊतांच्या 145 शेरो-शायरीचं ट्विट पडताच, सरकार बनेल, असेही मिम्स व्हायरल होत आहेत.