मी आज जो काही आहे, तो बाळासाहेबांमुळेच- नारायण राणे
By admin | Published: April 9, 2017 02:54 PM2017-04-09T14:54:38+5:302017-04-09T14:54:38+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्ठीचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्ठीचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. यावेळी नारायण राणेंनी कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच, तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही. मी कोणत्याही पक्षात असलो किंवा गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान माझ्या हृदयात अढळ आहे, माझ्या मनात मुंबईचा महापौर होण्याचं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी मला आमदारकीचं तिकीट दिलं. नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे. नाही तर हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधीच दिसला नसता, अशा शब्दात राणेंनी बाळासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
राणेंच्या पासष्ठीचा कार्यक्रमाला काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी यांसारख्या पक्षातील वजनदार आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रामराजे निंबाळकर, भाजपा नेते नितीन गडकरी, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित होते. माझ्या आणि नितीन गडकरींच्या मैत्रीत पावित्र्य आहे. मी आज काँग्रेसमध्ये असतानाही या कार्यक्रमाला नितीन गडकरी आले. याला कारण गडकरी आणि माझी मैत्री. आज विरोधी पक्षातल्या नेत्यासोबत बसताना, बोलताना जी काही घाबरगुंडी उडते, ती भीती नितीन गडकरींना वाटत नाही. आपलं पद धोक्यात घालून मैत्री निभावणं हे केवळ नितीनलाच जमतं. कोकणातल्या कार्यक्रमात मला नितीन गडकरींनी बोलावणं हे मैत्रीतूनच आलेलं, असं म्हणत नारायण राणेंनी नितीन गडकरींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. विलासरावांचं सरकार आम्ही पाडत होतो, सरकार गेल्यात जमा होतं. आमच्यातल्या काहींना ते आवडलं नाही. ते त्यांनी घडू दिलं नाही. जेव्हा कळलं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होतील तेव्हा सरकार पाडणार नाही हे निश्चित केलं. सुशीलकुमार शिंदेंना वाटलं राणेंनी आपलं नाव सुचवलं तेव्हा विरोधी पक्षाकडून मदत होईलच, पण झालं उलटं, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या आठवणींना नारायण राणेंनी उजाळा दिला.
मी जे ठरवतो तेच करतो आणि कुणालाच घाबरत नाही. कारण प्रामाणिकपणे काम केलं तर घाबरायचं कारण नसतं. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याशी जसा बोलायचो, आज सोनिया गांधी, राहुल गांधींशी तसेच बोलतो, असं राणे म्हणाले. आज आठवण येतेय ती गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांची. नितीन गडकरींचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे. त्यांचं वय त्यांना साथ देईल आणि काही तरी आगळंवेगळं चित्र देशात घडवतील, असंही राणे म्हणाले. मी जेवढी चिंता माझ्याबद्दल करत नाही, तेवढी चिंता मी कुठे जाणार याची महाराष्ट्राला, मीडियाला आज आहे, असा टोलाही त्यांनी मीडियाला लगावला.
विरोधी पक्षनेत्याने शिवलेला ड्रेस घालून बजेट मांडलं- जयंत पाटील
एकदा मी बरचसं वजन कमी केलं होतं. अर्थसंकल्प मांडण्यासाठी मला व्यवस्थित होणारे कपडे नव्हते. योगायोगानं राणे साहेबांना हे कळलं. माझ्याकडे माप घेणारा माणूस आला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता नवा ड्रेसही शिवून आला. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यानं दिलेला सूट घालून मी अर्थसंकल्प मांडला, असा किस्सा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितला.
राणेंनी शिवसेना सोडली नसती, तर- नितीन गडकरी
राणेसाहेब आणि मी दोघे मिळून विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावायचो. कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं. राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्व हे सेल्फ मेड आहे, या शब्दात भाजप नेते नितीन गडकरींनी नारायण राणेंनी स्तुतिसुमनं उधळली. पक्ष बदलल्यानंतर माणसं रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही. तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल, असं वक्तव्य केलं नाही. शिवसेना सोडल्यानंतर हे सिद्ध झालं की राणेंचं नेतृत्व पक्षापलिकडलं आहे. जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं, असे उद्गार गडकरींनी काढले.