'या' नेत्यांना शिवसेनेतून फोडलं तेव्हा कोणती चौकशी लावली? चंद्रकांतदादांचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 11:08 AM2019-07-31T11:08:29+5:302019-07-31T11:09:36+5:30
गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर होते.
मुंबई - भाजपा होणारे पक्ष प्रवेश हे ईडी, एसीबीची चौकशी लावून केले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. पवारांनी भुजबळांना, नाईकांना शिवसेनेतून फोडलं तेव्हा कोणती चौकशी लावली होती? असा थेट सवाल चंद्रकांतदादांनी पवारांना विचारला आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना स्वत:चं भविष्य दिसत असेल ते नेते पक्षप्रवेश करत आहेत. मंत्रीमंडळात एकूण मंत्र्यांपैकी 13 शिवसेनेचे सोडले तर उर्वरित 29 मंत्री ज्यांनी भाजपा उभारण्यासाठी मदत केली. ज्यांनी पक्ष वाढविण्यासाठी कष्ट घेतले अशांकडे मंत्रीपदे आहेत. त्यामुळे पक्षात जे प्रवेश करतील त्यांचा फायदा होईल तोटा होणार नाही अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक, चित्रा वाघ, निवृत्त सनदी अधिकारी साहेबराव पाटील यांचा भाजपात पक्षप्रवेश करण्यात आला.
तसेच पुढच्या आठवड्यात आणखी पक्ष प्रवेश होणार आहेत. प्रवेश करणाऱ्या नावांची छाननी करून निवड करावी लागते. कोणत्याही कार्यकर्त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. त्यांची समजूत काढण्यात येईल. इथे असणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी अन्याय झाला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. प्रवेश करणाऱ्या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी यावेळी कार्यक्रमाला होती.