'ती' सध्या काय करतेय?; मराठमोळ्या महिला दिग्दर्शिका गेल्या कुठे...
By संजय घावरे | Published: March 6, 2024 08:09 PM2024-03-06T20:09:11+5:302024-03-06T20:11:27+5:30
महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
मुंबई - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट चांगली गर्दी खेचत आहे. एका दिग्दर्शिकेने महिलांच्या दृष्टिकोनातून मांडलेला विषय रसिकांना आवडत आहे. अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत मात्र स्त्री दिग्दर्शिकांचे चित्रपट आलेले नाहीत. त्यामुळे 'ती' म्हणजेच मराठमोळी दिग्दर्शिका सध्या काय करतेय? असा प्रश्न पडतो.
महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पूर्वीच्या काळी केवळ अभिनय करणाऱ्या स्त्रियांनी काळानुरूप कॅमेऱ्यामागील तंत्रज्ञांच्या जागाही काबीज करत परीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या कलाकृती बनवल्या आहेत. यात दिवंगत सुमित्रा भावेंपासून मृणाल कुलकर्णी, स्वप्ना वाघमारे जोशी, समृद्धी पोरे, कांचन अधिकारी, रसिका आगाशे, मृण्मयी देशपांडे आदी बऱ्याच मराठी दिग्दर्शिकांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून मात्र दिग्दर्शिकांचा एकही मराठी चित्रपट आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सहेला रे' चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या मृणाल कुलकर्णी याबाबत म्हणाल्या की, मूळात स्त्री आणि पुरुष वेगळे करण्याची गरज नसल्याचे मला वाटते. फक्त महिला दिग्दर्शिकांचेच सिनेमे आलेले नाहीत असे नाही.
मागील वर्ष-दीड वर्षांत आघाडीच्या काही पुरुष दिग्दर्शकांचेही सिनेमे आलेले नाहीत. सातत्याने विविधांगी विषयांवर सिनेमे बनवणाऱ्या सुमित्रा भावे गेल्या, पण दिग्दर्शिकांचे काम थांबलेले नाही. प्रत्येकीच्या जीवनात काही ना काही घडामोडी घडत आहेत. सध्या काहीशी संभ्रमावस्था आलेली आहे. नेमके काय केल्याने चित्रपट चालतील, वेगळे काय करता येईल याचा सध्या शोध घेत असल्याचे मला वाटते. लेखन, दिग्दर्शनापासून, संगीत दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शनात स्त्रियांची संख्या उत्तम वाढली असून, हा टक्का वाढल्याचा खूप आनंद आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रिया फक्त अभिनेत्री होत्या. त्या केवळ निर्मात्या-दिग्दर्शिका बनल्या नसून, कॅमेऱ्यामागील सर्व कामे पूर्ण जबाबदारीने सांभाळत असल्याचा सार्थ अभिमान आहे. मराठीतच नव्हे तर जागतिक पातळीवरही निर्मिती-दिग्दर्शनासोबतच तंत्रज्ञांच्या रूपातील स्त्रियांचा सहभाग वाढला आहे.
सुमित्रा भावेंसोबत 'दोघी', 'देवराई', गुरींदर चढ्ढांसोबत 'ब्राईड अँड प्रेज्युडाईस', प्रेमा कारंथांसोबत 'बंद झरोखे', रसिका आगाशेसोबत 'तिचं शहर होणं', रेणुका शहाणेसोबत 'क्रॅास कनेक्शन' या स्त्री दिग्दर्शिकांसोबत आजवर काम केले. यावेळी त्या प्रत्येकीची माणूस म्हणून असलेली समज माझ्या मनाला स्पर्शून गेली. त्यांच्यासोबत काम करताना नेहमीच वेगळ्या अर्थाने सहजता वाटली. मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे स्त्री किंवा पुरुष असा भेद करून पाहिले नाही. दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो. दिग्दर्शन करणे हे फार जबाबदारीचे काम आहे. हि जबाबदारी पेलणाऱ्या मैत्रीणींचा मला प्रचंड अभिमान वाटतो. प्रत्येकीने मला अतिशय संवेदनशील व्यक्तिरेखा दिल्या. - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)
...पण डावलूही नका
काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये 'बार्बी'ला नामांकन मिळाले नाही. त्यावर स्त्रियांचा चित्रपट असल्याने डावलल्याचे बोलले गेले, पण त्यांच्या टिमने आम्ही असे काही मानत नसल्याचे म्हटल्याचे भावले. आमच्याकडे समानतेच्याच दृष्टिकोनातून पाहा असे त्यांचे म्हणणे होते. स्त्रियांचे असल्याने वेगळी वागणूक नको, पण डावलूही नका असे मृणाल म्हणाल्या.
यांचे चित्रपट निर्मिती प्रक्रियेत...
दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणि स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या मराठी चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया सध्या सुरू असून, हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.