रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाची अनुभूती देणाऱ्या बेस्ट बसची चाके आर्थिक गर्तेत रुतलेली असतानाच फुटलेल्या काचा, तुटलेल्या सीट्स आणि वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. कधी एसी बंद तर कधी दरवाजे उघडत नसल्याच्या तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे केल्या जात आहेत. अशा या बेस्टच्या असुविधेमुळे सांगा प्रवास कसा करायचा, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.
मुंबईकर प्रवाशांना प्रदूषण विरहित तसेच पर्यावरण स्नेही वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्ट उपक्रमाची आंतराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. आपल्या ताफ्यात अधिकाधिक इलेक्ट्रिक बस आणून प्रवाशांना अनेक दशकांपासून अविरत सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील यूआयटीपी पुरस्कार देण्यात आला आहे. बार्सिलोना येथे हा पुरस्कार सोहळा झाला असून बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी हा पुरस्कार स्वीकारला. असे असले तरी बेस्टची स्थिती म्हणावी तशी नाही. कालबाह्य झालेल्या बस, अचानक वाटेत बंद पडणाऱ्या बेभरवशी बसमधून मुंबईकरांचा प्रवास सुरू आहे.
तरीही रस्त्यावर बस धावतात
बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ हजार २२८ बसेस आहेत. यातील ५०० बस येत्या काळात कालबाह्य होणार आहेत. तर ४५ डबलडेकर बस असून यातील काही बसचे आयुमर्यादा संपुष्टात आली असतानाही या बस मुंबईच्या रस्त्यांवरून धावत आहेत. याबाबत बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, अनेकदा बस वाहतूक कोंडीत अडकतात, ब्रेक डाऊन होतात त्यावेळी गरजेला या बस चालविल्या जातात.
बंद एसी, नादुरुस्त खिडक्या
तुटलेल्या सीट्स, बंद एसी, नादुस्त खिडक्या, न उघडणारे दरवाजे याबाबत बेस्ट प्रशासनाकडून तक्रार केली जाते. मात्र या बस भाडेतत्त्वावरील असल्याचे सांगून अनेकदा वेळ मारून नेली जाते.
बेस्टच्या ताफ्यात इतक्या आहेत गाड्या
२०६६ साध्या बस, ११६२ एसी बस, १६४६ बेस्टच्या मालकीच्या बस, १५८४ भाडे तत्त्वावरील गाड्या.
बेस्ट उपक्रमाने बसचे खासगीकरण करू नये. बेस्टने स्वमालकीच्या बसचा ताफा वाढवावा. खासगीकरणामुळे प्रवाशांना अशा दुय्यम दर्जाची सेवा मिळत असून, खासगी कंत्राटदाराकडून बसची नियमित देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे बस नादुरुस्त होऊन बसचा खोळंबा होतो. त्याचा फटका बेस्ट उपक्रमासह प्रवाशांना बसतो. - सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना
या सर्व प्रकाराला बेस्ट प्रशासन जबाबदार असून बेस्ट प्रशासनाला संपूर्ण खासगीकरण करायचे आहे. बेस्टला तक्रार केल्यानंतर ही बस आमची नाही कंत्राटदार कंपनीची आहे अशी माहिती दिली जाते व सदर बस कंत्राटदार कंपनीकडे पाठवली जाते. यात मुंबईकरांचा काय दोष? हे असे किती दिवस चालणार ? याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. - केतन नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना, कार्याध्यक्ष