संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ तासात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या विषयाला घेऊन सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत आहे. मात्र, ज्यावेळी सार्वजनिक रुग्णालयात अशा घटना घडतात त्यावेळी त्याचा वैद्यकीय शास्त्राचा आधार घेऊन शोध घेतला पाहिजे. या सर्व मृत्यूचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करून ‘डेथ ऑडिट’चा अहवाल सादर करणे गरजेचे आहे. त्यातून सर्व माहिती उघड होणार असल्याचे मत सार्वजनिक रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून काम केलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या रुग्णालयातील मृत्यूची राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतील. तसेच या प्रकरणी सरकारने उच्चाधिकार समिती नेमून अहवाल मागितला आहे. त्याप्रमाणे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. रुग्णालयाच्या दाव्यानुसार मृत्यू झालेले रुग्ण ३३ ते ८३ वर्षाचे होते. काही वयोवृद्ध तर नऊ रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी दाखल करण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेकवेळा रुग्णालयात ज्यावेळी अशा पद्धतीने अनपेक्षित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतो, त्यावेळी त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती तयार करून यासाठी कोणती कारणे जबाबदार आहेत, याची माहिती घेऊन त्याचा अहवाल बनविला जातो. या प्रकरणातसुद्धा तशाच पद्धतीने अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता मृत्यू विश्लेषण समिती स्थापना करण्यात येणार आहे.
काय बघते समिती?
- रुग्ण कधी, केव्हा, कोणत्या परिस्थितीत दाखल झाला?- वायटल पॅरामीटर (नाडी दर, श्वास दर, शरीरातील तापमान, रक्तदाब दर) - रुग्णाच्या रक्त चाचण्यांचे अहवाल- रुग्णालयात केलेले निदान आणि त्यावर निश्चित केलेली उपचारपद्धती- रुग्णाच्या आजाराच्या इतिहासाच्या कागदपत्रांची पाहणी केली जाते.- रुग्णाला सहव्याधी कोणत्या होत्या?- रुग्णाचे वय आणि त्याला झालेला आजार- अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या आरोग्याचा तपशील- शवविच्छेदन अहवालातील मृत्यूचे कारण
माजी अधिष्ठाते म्हणतात...
मी सार्वजनिक रुग्णालयात काम केले आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टींचा अधिष्ठातांना सामना करावा लागतो, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. मोठ्या संख्येने रुग्ण दगावणे दुर्दैवी घटना आहे. त्या घटने मागची शास्त्रीय कारणे शोधून त्याचा अहवाल सादर करणे गरजेचे आहे. त्याचे कुठल्याही पद्धतीने राजकारण होता कामा नये. सार्वजनिक रुग्णालयात रुग्ण जेव्हा खासगी रुग्णालयातून येतो तेव्हा तो अत्यवस्थेत येत असतो. त्याच्यावर उपचार करणे रुग्णालयाची जबाबदारी असते. मात्र, जर रुग्णांचा मृत्यू होत असेल तर त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते जगासमोर येईल. या मृत्यूची सखोल चौकशी करून कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. - डॉ. शुभांगी पारकर, माजी अधिष्ठाता, केइएम रुग्णालय.
या मृत्यूची चौकशी करताना डेथ ऑडिटमधून अनेक गोष्टी उजेडात येतीलच. मात्र, त्यासोबत औषधाचे ऑडिटसुद्धा केले गेले पाहिजे. कोणती भेसळयुक्त औषधे त्यांना दिली गेली आहेत का? ऑक्सिजन देताना काही गडबड झाली आहे का? तसेच आयव्ही सलाईनमधून जी औषधे दिली त्यांचा दर्जा कसा होता? या सर्व गोष्टींची चौकशी केली पाहिजे. तसेच गेल्या दहा वर्षांत किती मृत्यू झाला आहे, त्याचा सरासरी मृत्यूदर काढणे गरजेचे आहे. तसेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या मोसमानुसार किती मृत्यू होतात, त्याची माहिती काढणे गरजेचे आहे. रुग्णालयांचा सरासरी मृत्यूदर काढून सखोल अहवाल सादर केल्यास या मृत्यूची कारणे समोर येऊ शकतात. - डॉ. प्रवीण शिनगारे, माजी अधिष्ठाता, सर जे जे रुग्णालय.