पोस्टल आणि ईव्हीएम मतांमध्ये फरक कसा? आ. वरुण सरदेसाई यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:25 AM2024-12-03T05:25:24+5:302024-12-03T05:25:52+5:30
पोस्टल आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये इतका फरक कसा पडतो? असा सवाल उद्धवसेनेचे सचिव आ. वरुण सरदेसाई यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये १४३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पोस्टल मतांमध्ये पुढे होते. परंतु, ईव्हीएम मतांमध्ये त्याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पुढे कसे गेले? प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीची ५ ते १५ टक्के मते कमी झाली तर महायुतीची मते वाढली. पोस्टल आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये इतका फरक कसा पडतो? असा सवाल उद्धवसेनेचे सचिव आ. वरुण सरदेसाई यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार
परिषदेत निवडणूक आयोगाला केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या मतांवर आक्षेप घेत आहेत. मात्र, पोस्टल मते आणि ईव्हीएममधील मतांमध्येही फरक आहे. लोकसभा आणि यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पोस्टल आणि ईव्हीएम मतांचा ट्रेंड सारखाच राहिला आहे. तो यावेळी फसला कसा? अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचा डेटा जुळत नाही याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असेही ते म्हणाले.
शंकाचे निरसन आयोगाने करावे
विधानसभा निवडणुकीत पोस्टलमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेऊनही महायुती ईव्हीएममध्ये विजयी झाली असे का घडले? १४३ पैकी १३०, १३५ जागा जिंकलो असतो तर मान्य होते. ५ ते १० टक्के जागांचा फरक होऊ शकतो. परंतु, ईव्हीएममध्ये आमची मते कुठेच कशी वाढली नाहीत? निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. निवडणूक आयोगाचे काम निवडणूक घेणे आहे. त्यामुळे ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्यांचे निरसन निवडणूक आयोगाने करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.