मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. काल (मंगळवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस सुरु आहे. याचदरम्यान विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
वंदे भारतमुळे लोकल ट्रेनच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच आयएफएससी सेंटर गुजरातहून महाराष्ट्रात कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवे. मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जाते त्याकडे लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रातील नेत्यांनी गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार करावा, असं रोहित पवार म्हणाले.
अटल सेतूवर आकारण्यात येणाऱ्या टोलची रक्कम कमी करण्यात यावी. महानंदच्या जमीनीबाबत घेण्यात आलेला निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा. गिरणी कामगारांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या सरकारने जाणून घ्याव्यात. मुंबई मनपाच्या निधी वाटपात भेदभाव झाला आहे, सर्वत्र समान विकास व्हावा असा विचार करायला हवा, असं रोहित पवारांनी सांगितले.
सरकारकडे जेव्हा पैसे कमी असतात तेव्हा त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, व त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आरोग्य, शिक्षण या विभागांवर सरकारला काम करावे लागेल. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा योग्य वापर करावा. बुलेट ट्रेनचे फक्त ४ स्टेशन्स आपल्या महाराष्ट्रात येतात, गुजरातमध्ये ५ स्टेशन्स आहेत. त्यासाठी १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याची केंद्र सरकारने जबाबदारी घ्यावी, महाराष्ट्र सरकारने कर्ज घ्यायचे कारण काय? विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरज काय?, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.