मुंबई: मुंबईतले भटके कुत्रे आणि इतर पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी तसेच प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अखेर बुधवारपासून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.ही मोहीम ह्यूमेन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या समदतीने हाती घेण्यात आल्याची माहिती देवनार पशवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. दर १० वर्षांनी श्वानगणना करण्यात येत असून या पूर्वी २०१४ मध्ये श्वानगणना करण्यात आली होती.भटक्या कुत्र्यांच्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांच्या सध्याची वास्तविक संख्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल तसेच २०१४ च्या संख्येसोबत त्याची तुलनात्मक मांडणी करण्यात येईल. याच्या आधारे नेमक्या ज्या भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे, त्या ठिकाणांसाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आखून प्राणी कल्याण संस्थांच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती पठाण दिली.
या सर्वेक्षणातून प्राप्त स्थितीनुसार भटक्या श्वानांची सध्याची स्थिती आणि त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगानेही आवश्यक पावले उचलता येतील तसेच पाळीव प्राण्यांच्या सर्वेक्षणातून लोकांमध्ये नेमके कोणते पाळीव प्राणी पाळण्याचा कल आहे, हे समजेल. तसेच मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि आरोग्य स्थितीही जाणून घेता येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.