राज ठाकरेंची राजकीय महत्वाकांक्षा काय? मनसेप्रमुखाचे त्यांच्याच स्टाईलने उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 06:00 PM2023-07-14T18:00:50+5:302023-07-14T18:04:02+5:30
राज्याच्या राजकारणात सत्ता आणि पद मिळवण्यासाठी सध्या स्पर्धा चाललीय. त्यासाठी, अनेकदा अनैतिक मार्गाचाही वापर झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई - राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींपासून राजकारणातील उलथापालथ चार वर्षांनंतरही सुरू आहे. या काळात फोडाफोडीच्या राजकारणाचे अनेक प्रयोग राज्यात झाले. आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्षांची नव्याने मोर्चेबांधणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. विशेष म्हणजे मी वेळ आल्यास घरात बसेन पण असली युती अन् आघाडी करणार नाही, असेही राज यांनी म्हटले. त्यामुळे, राज ठाकरेंचा वेगळाच ठसा राजकारणात आहे.
राज्याच्या राजकारणात सत्ता आणि पद मिळवण्यासाठी सध्या स्पर्धा चाललीय. त्यासाठी, अनेकदा अनैतिक मार्गाचाही वापर झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री पदावरुन राज्यातील राजकारण वेगळ्याच दिशेला गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेबद्दल विचारले असता, त्यांनी त्यांच्या स्टाईलने वेगळंच उत्तर दिलं. तर, सीएम किंवा पीएम ही पदं महत्वाकांक्षा असूच शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
राज ठाकरेंची राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहे? म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय का, पंतप्रधान व्हायचंय? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना महत्वाकांक्षा कधीही मोठीच असायला हवी. सीएम, पीएम ही पदं आहेत, ते येत असतात आणि जात असतात. पण, मला महाराष्ट्रात अशी एक जागा निर्माण करायची आहे, जी पाहिल्यानंतर विदेशातील पर्यटकही म्हणतील, कमाल का स्टेट है... असे राज ठाकरेंनी एका प्रश्नावरील उत्तरात सांगितलं.
मला काय बनायचंय ही महत्वाकांक्षा असू नये, तर मला करायचंय काय ही महत्वाकांक्षा असावी. माझी शहरं आहेत, पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद ही शहरं अशी बनावीत की जगभरातील लोकांनी बघतंच राहावं, असे राज यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या भूमीत काय नाही, ७५० किमीचा समुद्र आहे, सह्याद्री आहे, जंगलं आहेत, शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. महाराष्ट्रात असं भरपूर आहे, पण ते नीट प्रोजेक्ट्स केले जाते नाही, नीट संवर्धन केले जात नाही. महत्वाकांक्षा ही नसावी मला काय मिळते, ती अशी पाहिजे की लोकांना काय मिळेल, असे म्हणत राज ठाकरेंनी महत्वाकांक्षा याविषयी सविस्तर स्पष्टीकरणच दिले.
तसलं राजकारण मला जमणार नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कुठल्या पक्षासोबत युती करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना, सध्या हे जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्यात मी कुठल्या पक्षासोबत युती करेन, असं वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच असलं व्याभिचारी राजकारण मी करणार नाही. मला ते जमाणार नाही. तसेच ह्याला जर राजकारण म्हणत असाल तर तसं राजकारण करण्यास मी नालायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.