दिवाळीच्या फराळाचा बेत काय?; महागाईत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 12:56 PM2023-11-06T12:56:46+5:302023-11-06T12:57:28+5:30
लाडू, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, करंजी यांचे दर अधिक वाढलेले आहेत.
मुंबई : मागील काही वर्षांपासून व्यस्त दिनक्रमामुळे घरी फराळाचा घाट घालण्याऐवजी रेडिमेड घरगुती फराळाकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. मात्र आता या फराळाचे दरही सामान्यांच्या आटोक्याबाहेर गेले आहेत. यंदाच्या महागाईत आता नेमका कोणता फराळ घ्यायचा, या संभ्रमात ग्राहक दिसून येत आहेत. यंदा दिवाळीच्या फराळात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. लाडू, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, करंजी यांचे दर अधिक वाढलेले आहेत.
घरगुती फराळाला मागणी
यंदा रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळ बनवून विकणाऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे.
रेडिमेड फराळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दिवाळी जवळ आली असून खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असे फराळ विक्रेत्या सुनीता गोडबोले यांनी सांगितले.
यामुळे वाढले दर
ऐन दिवाळीच्या सणात मैदा, बेसन, पोहे, रवा, गूळ, साखर, खोबऱ्यासह तूरडाळ आणि कडधान्याचे भाव कडाडले आहेत.
किरकोळ बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू ३५ ते ४० टक्के महागल्याने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
फराळाच्या पदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत.