न झालेल्या साखरपुड्याची गोष्ट! राज-उद्धव यांच्यात युती न होण्यामागे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:59 AM2023-02-22T09:59:45+5:302023-02-22T10:00:26+5:30
त्यात काही अर्थ नाही आणि ते लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. ही होती न झालेल्या साखरपुड्याची गोष्ट...
सचिन लुंगसे
मुंबई - मुंबई असो वा राज्याची निवडणूक. अशी कोणतीच निवडणूक नाही की जिथे ठाकरे फॅक्टर चर्चेत नाही. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्याने तर कित्येक निवडणुका गाजल्या. मात्र, हे दोघे काही एकत्र आले नाहीत. आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्या असून, या निवडणुकीत तरी हे दोन भाऊ एकत्र येणार का, या चर्चेने जोर पकडला असला तरी यापूर्वी अनेकदा असे प्रयत्न झाले आहेत. मनसेचे दूत यापूर्वी या युतीचा प्रस्ताव मातोश्रीवर घेऊन गेले असताना ठरलेला साखरपुडा कसा मोडला, त्याची ही गोष्ट.
२०१७ साली उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळच्या आणि नातेसंबंधातील एक व्यक्तीची मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी भेट झाली. उद्धव आणि राज या दोघांनी एकत्र यावे, असे या दोघांनाही वाटत असल्याने दोघांनीही या विषयावर आपापल्या साहेबांशी बोलयाचे ठरवले. संदीप देशपांडे यांनी ही गोष्ट राज ठाकरे यांच्या कानावर घातली. तेव्हा राज यांनी संदीप यांना ‘तू उद्धवला किती ओळखतो...?’ असा प्रतिप्रश्न करीत संदीप यांना सगळे अधिकार देत ‘तू म्हणशील ते आपण फायनल करू’, असे सांगितले. त्यानंतर युतीबाबत अनेक बैठका झाल्या. दरम्यान, २६ जानेवारीच्या आसपास शिवसेना-भाजप युती तुटली. म्हणजे तेव्हा त्यांनी तशी घोषणा केली. त्याच्या एक दिवसआधी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी असे दोघे जण मातोश्रींवर उद्धवना भेटायला गेले. तत्पूर्वी राज यांनी संदीप यांना सांगितले होते की, ‘उद्धव यांना भेटायला जाऊ नकोस. जे काही आहे ते फोनवर बोलू.’ तरीही संदीप आणि संतोष हे दोघे मातोश्रीवर दाखल झाले. कारण काही तरी चांगले होईल म्हणून. एक वेळ राजसाहेबांच्या शिव्या पडल्या तरी चालतील; पण युती व्हावी ही संदीप देशपांडे यांची इच्छा होती.
उद्धव यांच्याशी संदीप आणि संतोष यांची भेट झाली तेव्हा उद्धव यांनी संदीप यांना सांगितले की, ‘२६ जानेवारी रोजी आम्ही एक लग्न मोडत आहोत. हे लग्न मोडले की आपण साखरपुडा करू...’ त्यावेळी, ‘संदीप तुझे काय? तुझ्या पत्नीने राजीनामा दिला आहे. तुझे कसे करणार...’, असे सवाल करीत ‘तुझा प्रभाग आम्हाला हवा आहे...’ अशी इच्छाही उद्धव यांनी व्यक्त केली. त्यावर ‘राजसाहेब म्हणाले तर मी बघतो माझे कसे करायचे. माझे टेन्शन घेऊ नका...’ असे संदीप यांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांत युती तुटल्याची घोषण झाली आणि युतीची चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून संदीप यांना जी व्यक्ती भेटली होती ती व्यक्ती भेटायचीच बंद झाली. उद्धव हे राज यांचे फोन घ्यायचे बंद झाले. एवढे सगळे घडल्यानंतर संदीप यांनी मग राज यांना ‘त्यांना जर युती करायची नव्हती तर तो माणूस आपल्याला का भेटला. त्यांनी आपल्या डोक्यात असे का भरवले...’ असे विचारले. तेव्हा राज यांनी उत्तर दिले ते असे... ‘शिवसेनेला अशी शंका होती की आपण भाजपबरोबर जाऊ. आपण भाजपबरोबर जाऊ नये म्हणून त्यांनी हे असे केले. तसेही आपण भाजपबरोबर जाणारच नव्हतो...’
तेव्हापासून आजपर्यंत ही युती होऊ नये, असे कोणाला वाटत असेल तर यात पहिले संदीप देशपांडे आहेत. त्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल संदीप देशपांडे म्हणतात, त्यात काही अर्थ नाही आणि ते लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. ही होती न झालेल्या साखरपुड्याची गोष्ट...