मुंबई - राज्यातील परिवहन मंडळाच्या एसटींची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. कुठे ड्रायव्हर स्टेअरींगला दोरी बाधून असतात, तर कुठे कंडक्टर बसण्याचं सीट खिळखिळं झालेलं असतं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये, बसचा टपच हवेत उडत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर, संबंधित आगाराने या घटनेची दखलही घेतली होती. मात्र, बसमधून प्रवास करतानाही प्रवाशांना असा मनस्ताप सहन करावा लागतो. यावरुन आता, मनसेनं एक व्हिडिओ शेअर करत परिवहनमंत्र्यांना सवाल केला आहे.
राज्य शासनाने महिलांना बसमधील प्रवासात ५० टक्के भाडे कपात केली आहे. त्यामुळे, महिलां प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढलीय. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढली असतानाही दुसरीकडे प्रवाशांना बसमधून मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि आरामदायी प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बसमधून प्रवास करताना अनकेदा बसची अवस्था खराब असल्याने प्रवाशांना उठ-बशा काढत प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघात होण्याचीही भीती अशा बसेसमुळे निर्माण होते. मनसेने असाच एका बसचा व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांना सवाल केला आहे.
नगरमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसचं चाक निखळलं, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ७५ वर्ष जुनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी आचके का देत आहे?, असा सवाल मनसेनं व्हिडिओ शेअर करत विचारला आहे. तसेच, 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' म्हणत मिरवणारे 'त्रिकुट' काय करतंय? एसटीचंच नव्हे तर ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एक-एक चाक निखळतंय... परिवहन मंत्री महोदय वेळीच लक्ष द्या, असे आवाहनही मनसेच्यावतीने करण्यात आलं आहे.
मनसेनं बस प्रवाशांच्या आणि चालक-वाहकांच्या अडचणींकडे लक्ष वेधण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं शासनाच्यावतीने सांगण्यात येतं. मात्र, प्रवाशांची सोय म्हणून सोडण्यात आलेल्या या बसेसच प्रवाशांची गैरसोय होता कामा नये, हीच सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे.