कसली एसी लोकल? उकाड्याने जीव जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 11:29 AM2023-05-25T11:29:52+5:302023-05-25T11:29:52+5:30
विरार-चर्चगेट जलदच्या प्रवाशांचा पारा चढला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. विरार-चर्चगेट जलद एसी लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास कोंडला होता. अखेर वांद्रे स्थानकात एसी लोकलला थांबवून बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७:५६ मिनिटांची विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणांमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवासी अक्षरश: गुदमरले. त्यातच प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्यांनी याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली.
भर उन्हाळ्यात एसी लोकलमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या बिघाडामुळे सध्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे.
रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार
उन्हाळ्याची हिट असल्याने उकाडा खूपच वाढलेला आहे. त्यामुळे प्रवासी तिपटीने पैसे मोजून एसी लोकलचा प्रवास करत आहेत. मात्र, अशा वेळी लोकलमधील एसीच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना एसी विना प्रवास करावा लागला आहे. रेल्वे प्रशासनाचा या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकलच्या रांगा
एसी लोकलचा दरवाजा बंदच होत नसल्याने भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली या स्थानकावर लोकल जादा वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर वांद्रे स्थानकांवर लोकल थांबविण्यात आली. हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर ही लोकल चर्चगेट दिशेकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागोमाग खोळंबल्या होत्या. परिणामी अनेक जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.