Join us

जो मुद्दाच नाही त्यावर आंदोलन कसलं?, मनसेची फक्त नौटंकी आणि फुसका बार; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 11:00 AM

राज्यात सर्व कायदेशीररित्या लाऊडस्पीकर आहेत आणि भोंग्यांवरुन आंदोलन करण्यासाठी स्थिती नाही हे आज सर्वत्र दिसून आलं आहे. मनसेचं आंदोलन कुठे दिसूनच आलं नाही.

मुंबई-

राज्यात सर्व कायदेशीररित्या लाऊडस्पीकर आहेत आणि भोंग्यांवरुन आंदोलन करण्यासाठी स्थिती नाही हे आज सर्वत्र दिसून आलं आहे. मनसेचं आंदोलन कुठे दिसूनच आलं नाही. त्यामुळे ही एक दिवसाची नौटंकी आणि फुसका बार आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"मनसेचं आंदोलन कुठे दिसलच नाही. कारण राज्यात भोंग्यांवरुन आंदोलन करण्याची स्थिती नाही. त्यामुळे जो विषयच अस्तित्वात नाही अशा विषयांवर कसं आंदोलन करताय?", असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला आहे. मनसेच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आंदोलन यशस्वी व्हायला आधी ते सुरू व्हावं लागतं, असा टोला लगावला. 

"हिंदुत्व हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. त्यामुळे बेगडी हिंदुत्वावाद्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करु नये. असं कुणी कितीही बाळासाहेबांच्या भाषणांचे दाखले देऊ द्यात. जे दाखले देत आहेत त्यांना बाळासाहेब नीट समजलेलेच नाहीत. अशांना आम्ही बाळासाहेबांच्या भाषणांच्या कॅसेट्स पाठवून देऊ. बाळासाहेबांनी नक्कीच मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सरकार आल्यानंतर रस्त्यावरील नमाजाचा मुद्दा निकाली काढला होता. आज राज्यात अनधिकृत भोंग्यांचाही प्रश्न निकाली निघालेला आहे. त्यामुळे आंदोलन करण्यासारखी स्थिती राज्यात कुठेच नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

"शिवसेनेला हिंदुत्व शिकवणाऱ्यांचं हिंदुत्व बेगडी आहे. सध्या ते जिथून हिंदुत्वाची शिकवणी घेत आहेत त्यांच्या मास्तरांची डीग्री तपासून घ्यावी. ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं म्हणजे त्यांनी त्याचवेळी बाळासाहेबांचा विचारही सोडला. त्यामुळे हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही", असंही राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतमनसेराज ठाकरे