महापालिकेने कसली कंबर; पुढील वर्षी शाडूच्या मूर्तीचा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:49 PM2023-09-28T13:49:22+5:302023-09-28T13:49:51+5:30

मूर्तिकारांना एक हजार मेट्रिक टन शाडूची माती देण्याचा निर्णय

What kind of waist is the municipal corporation; Shadu idol number next year | महापालिकेने कसली कंबर; पुढील वर्षी शाडूच्या मूर्तीचा नंबर

महापालिकेने कसली कंबर; पुढील वर्षी शाडूच्या मूर्तीचा नंबर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिस नको, शाडूची गणेशमूर्ती हवी हा दरवर्षीचा आग्रह. पण, राजकीय दबावामुळे शाडूची माती  अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय होऊ शकलेली नाही. मुंबई पालिकेने मात्र पुढील वर्षांपासून जास्तीत जास्त मूर्ती शाडूच्या बनाव्यात यासाठी आतापासून कंबर कसली आहे. पुढील वर्षी गणेशमूर्तीसाठी तब्बल एक हजार मेट्रिक टन शाडूची माती उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

यंदा पालिकेने मूर्तिकारांना ३५० मेट्रिक टन शाडू उपलब्ध करून दिली होती. खरे तर पालिकेने ६५० मेट्रिक टन शाडूची ऑर्डर दिली होती. त्यासाठी निविदा काढली होती. मात्र, मागणी ४०० मेट्रिक टन एवढी नोंदविली गेली. त्यातून सुमारे २० हजार मूर्ती घडल्या. या प्रतिसादामुळे पालिकेचा हुरूप वाढला आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यातच मूर्तिकारांना शाडू देण्याची तयारी केली आहे.

शाडूसाठी मोठ्या मंडळांचा आग्रह अपेक्षित
मोठ्या मंडळांनी शाडूच्या मूर्तीचा पर्याय स्वीकारला तर प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय मिळू शकतो. मखर तयार करण्यासाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होत असे. मात्र थर्माकोलवर पूर्ण बंदी टाकण्यात आल्याने थर्माकोल जवळपास इतिहासजमा झाला. लोकांनी मखर सजविण्यासाठी थर्माकोलऐवजी अन्य पर्याय वापरला. 

प्लास्टर ऑफ पॅरिसची डोकेदुखी
    दरवर्षी मंडळांच्या आणि घरगुती गणपतीच्या मूर्तीत मोठी वाढ होत आहे. यातील बहुसंख्य मूर्ती या प्लास्टरच्या असतात. खरी समस्या उभी राहते ती विसर्जनानंतर! प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाहीत.
    मूर्तीचे कितीही खोल पाण्यात विसर्जन केले तरी समुद्राला भरती आल्यानंतर मूर्तीचे भग्न अवशेष किनाऱ्यावर येतात. ज्या बाप्पाची आपण १० दिवस मनोभावे पूजा करतो, त्या बाप्पाच्या मूर्तीची अवस्था पाहून दुःख होते.
    शिवाय हे भग्न अवशेष एकत्र करून त्यांची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावावी लागते.

शाडूची माती ही प्रामुख्याने गुजरात 
आणि राजस्थानमधून येते. महाराष्ट्राच्या काही भागातही ती मिळते. यंदा शाडू माती गुजरातमधून आली होती.

 मोठ्या मूर्ती कशा बनणार?  

शाडूच्या मूर्तीची जपणूक करणे कठीण असते. मग आता प्रश्न आहे की मोठ्या मूर्ती कशा घडणार? मोठ्या मूर्ती या किमान  १२ ते १५ फुटाच्या असतात. शाडूची एक मोठी मूर्ती बनवायला किमान १५ दिवस लागतात. त्यासाठी खास कारागीर लागतो. एका मूर्तीवर एकच कारागीर काम करू शकतो, अशी माहिती मूर्तिकार राजन झाड यांनी दिली. मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कालावधी पाहता आम्हाला जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात करावी लागेल. उत्सवाच्या खूप आधी मंडप उभारायला पालिका परवानगी देणार का, असा सवाल त्यांनी केला. 

 

Web Title: What kind of waist is the municipal corporation; Shadu idol number next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.