नाईक, खडसे आज कोणते प्रश्न सोडविणार?

By Admin | Published: November 21, 2014 12:04 AM2014-11-21T00:04:56+5:302014-11-21T00:04:56+5:30

मत्स्यविकास मंत्री एकनाथ खडसे हे मच्छीमारांच्या कोणत्या समस्या सोडविण्याबाबत घोषणा करणार त्याकडे राज्यातील तमाम मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

What kind of questions will be solved by Naik, Khadse? | नाईक, खडसे आज कोणते प्रश्न सोडविणार?

नाईक, खडसे आज कोणते प्रश्न सोडविणार?

googlenewsNext

हितेन नाईक, पालघर
जागतिक मच्छिमार दिनानिमित्ताने सातपाटी येथे आयोजिलेल्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामनाईक यांच्या सत्कार सोहळ्यात ते आणि सोहळ्याचे अतिथी मत्स्यविकास मंत्री एकनाथ खडसे हे मच्छीमारांच्या कोणत्या समस्या सोडविण्याबाबत घोषणा करणार त्याकडे राज्यातील तमाम मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.
माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य साधून सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था व फिशरमेन्स सर्वोदय सहकारी संस्था आणि कृती समितीच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या प्रश्नांची कळकळ असणाऱ्या व त्यासाठी केंद्रातील आघाडी सरकारशी भांडणाऱ्या राम नाईक व मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी मच्छीमारांच्या प्रमुख प्रश्नाबाबत उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकारात्मक घोषणा करावी अशी भाबडी आशा मच्छीमार बांधव ठेवून आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई बोर्डीदरम्यानच्या किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या प्रमुख मागण्या मागील तीस वर्षापासून केंद्र व राज्य शासन दरबारी पडून आहेत. दुय्यम ठरलेल्या जेट्ट्या, मासे सुकविण्याचे ओटे इ. सोयीसुविधा देताना कर्ज माफी, बीपीएलची अवास्तव अट शिथील करणे, पर्सीनेटवर बंदी इ. प्रमुख प्रलंबित मागण्याची जाण माजी केंद्रीय मंत्री व सत्कारमूर्ती राज्यपाल राम नाईकांना असल्याने ते केंद्रातील व राज्यातील आपल्या सरकारकडून या समस्यांची सोडवणूक करण्याची घोषणा करतील व आपण मच्छीमारांचे खरे कैवारी असल्याची उपाधी सार्थ ठरवितील अशी अपेक्षा समस्त मच्छीमार बाळगून आहेत.
पालघर जिल्ह्यातील २८ किनारपट्टीगावातील ४५ सहकारी संस्थांच्या माध्यमातून तीन हजार नौकाद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. यामधून कोट्यावधी रू. चे परकीय चलन शासनाला मिळत असते, असे असताना मागील तीस वर्षापासून नॅशनल फिशवर्कस फोरम, सहकारी संस्था, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती इ. नी मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्यांची शेकडो निवेदने केंद्र व राज्य शासनाकडे दिली आहेत. माजी मत्स्यव्यवसाय मंत्री भाऊसाहेब वर्तक, सुशिलकुमार शिंदे ते आताचे मधुकर चव्हाण इ. अनेकांना निवेदने देऊन मच्छीमारांचे हात आता थकले आहेत. परंतु आजही केंद्र व राज्य शासनाशी निगडीत अनेक मागण्यापैकी महत्वपूर्ण मागण्या प्रलंबित आहेत. त्याचे प्रतिनिधीत्व नाईकांनी अनेकदा केले आहे.

Web Title: What kind of questions will be solved by Naik, Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.