नवी दिल्ली - कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक कविता ट्विट केली आहे. राहुल यांनी या कवितेतून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना वीराची उपमा देत राहुल यांनी "वीर तुम बढे चलो" शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या आहेत. राहुल गांधींच्या या कवितेनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत, ये क्या जादू हो रहा है राहुलजी? असा प्रश्न नड्डा यांनी विचारला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून मोदी सरकार शेतकरी हितीचे नसून उद्योजकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, भाजपाकडून काँग्रेस नेत्यांना त्यांच्या जुन्या विधानाची, जाहीरनाम्याची आठवण करुन देण्यात येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर करुन काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे, उत्तर प्रदेशमधील एका दौऱ्याचं उदाहरण देत आहेत. मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो असता, एका शेतकऱ्याने मला प्रश्न विचरला. राहुलजी, आम्ही बटाट्याचं पीक घेतो, जो बटाटा 2 रुपये किलोने विकला जातो. पण, आमची मुलं जेव्हा या बटाट्यापासून बनणारे चिप्स विकत घेतात, तेव्हा 1 बटाट्याच्या चिप्ससाठी 10 रुपये मोजावे लागतात, असं का? असा प्रश्न विचारला. तसेच, आमच्यात आणि कंपन्यांमध्ये थेट व्यवहार होत नसून दलालांमार्फत व्यवहार होत आहे, त्यामुळेच अशी परिस्थिती असल्याचं संबंधित शेतकऱ्याने म्हटलं होतं. त्यामुळे, शेतकरी आणि कंपन्यांच्या मधील दलाल हटविणे गरजेचं असल्याचं मत राहुल यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलंय.
राहुल गांधींची भाजपावर टीका
शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर प्रशासनाकडून होणारी अडवणूक, त्यांच्यावर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा अशा सर्वांचा उल्लेख राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या जाचाला शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, असं म्हणत राहुल यांनी शेतकरी आंदोलकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल यांनी या कवितेसोबत शेतकरी आंदोलनाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. या फोटोंमधून शेतकरी आंदोलकांसमोर आव्हानं दाखविण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलकांवर होणारे पाण्याच्या फवाऱ्याचे मारे, शेतकऱ्यांना झालेल्या जखमा, वृद्ध महिला शेतकऱ्यांचा बोचऱ्या थंडीत ठिय्या आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी असे काही फोटो राहुल यांनी कवितेसोबत ट्विट केले आहेत.