मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीमध्ये स्नानाला जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १६ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट सुशोभीकरणाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. ऑक्टोबर, २०२० मध्ये झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील सर्व घाटांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात काही घाट नादुरुस्त असल्याचे समोर आले. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक या घाटांवरूनच मार्गाक्रमण करून चंद्रभागेच्या काठावर स्नानाला जातील. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी न्यायालयाला सांगितले की, आवश्यक असलेली सर्व काळजी घेण्यात आली आहे. एसओपी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही. त्यावर न्यायालयाने चंद्रभागेला स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याबाबत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.