दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्याची गरज काय?

By admin | Published: August 28, 2016 04:01 AM2016-08-28T04:01:05+5:302016-08-28T04:01:05+5:30

मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याची काही गरज नाही. मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मितेचा प्रश्न असला तरीही दरवर्षी भरवण्याचा अट्टहास ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही

What is the need to fill Literature every year? | दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्याची गरज काय?

दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्याची गरज काय?

Next

कल्याण : मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याची काही गरज नाही. मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मितेचा प्रश्न असला तरीही दरवर्षी भरवण्याचा अट्टहास ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही, असे खळबळजनक विधान अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केले. मात्र, हे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण सार्वजनिक वाचनालयातर्फे कवी राजीव जोशी यांच्या ‘कानामात्रावेलांटी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कविवर्य केशवसुतांच्या काळातही अनेक कवी होते. परंतु, ते रसिकांपर्यंत पोहोचले नाही. मराठी साहित्य अभिरुची वाढवली पाहिजे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, त्याकरिता मराठी साहित्य संमेलने ही बडेजाव करणारी नसावीत. ती खर्चिक नसावी. संमेलनात साहित्याचा विचार पेरला जावा.
महामंडळाचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी ४०० पेक्षा जास्त साहित्यातील मान्यवरांना पत्रे लिहिली. त्यात मी हीच भूमिका मांडली होती. आता मी महामंडळाचा अध्यक्ष असून संमेलने ही लेखकांची असावीत, हीच माझी भूमिका आहे. महामंडळाने हीच भूमिका स्वीकारली आहे. तथापि, संंमेलने दरवर्षी भरवली जाऊ नयेत, ही माझी व्यक्तिगत भू्मिका आहे. ती महामंडळाची भूमिका नाही.
सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य संमेलन कल्याणमध्ये भरवण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले आहे. मात्र, संमेलन स्थळ समितीची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्थळ समितीच्या पाहणीपश्चात संमेलन कोठे घ्यायचे, याचा निर्णय होईल. तो माझा एकट्याचा निर्णय नसेल, तर समितीने दिलेल्या निर्णयाला मी अध्यक्ष म्हणून बांधील राहणार आहे. त्यामुळे संमेलन कल्याणमध्ये होणार की नाही, यावर आताच भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: What is the need to fill Literature every year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.