प्लॅस्टिकला पर्याय काय?, प्रदर्शनातून महापालिका देणार उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:17 AM2018-06-22T02:17:19+5:302018-06-22T02:17:19+5:30
मुंबई महापालिका क्षेत्रात ‘प्लॅस्टिक बंदी’ राबविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. याचा भाग म्हणून जनजागृती साधणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात ‘प्लॅस्टिक बंदी’ राबविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. याचा भाग म्हणून जनजागृती साधणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या ‘प्लॅस्टिक’वर प्रतिबंध येत असतानाच, ‘प्लॅस्टिकला पर्याय काय?’ असाही प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जात आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या आणि उत्पादकांच्या अनेक प्रश्नांची सहजसोपी उत्तरे देणाºया तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन वरळी येथे २२ ते २४ जून दरम्यान करण्यात आले आहे.
वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया’च्या प्रेक्षागारात २२ ते २४ जून दरम्यान आयोजित या प्रदर्शनाचे २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता उद्घाटन होईल. या उद्घाटन कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, चित्रपट अभिनेता अजय देवगण, चित्रपट अभिनेत्री काजोल, अमृता फडणवीस, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. प्लॅस्टिकला पर्याय असूच शकत नाही, असे अनेकांना वाटत आहे. शिवाय, प्लॅस्टिकबंदीमध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, नारळ पाणी पिताना प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरावी की नाही? प्लॅस्टिक पिशवीला पर्याय काय? रेनकोट चालेल का? विविध वस्तूंचे उत्पादन करणाºया उत्पादकांनी पॅकेजिंग करताना काय काळजी घ्यावी? व्यावसायिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, असे अनेक प्रश्न मुंबईकरांना सतावत आहेत.
या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांसह व्यावसायिकांनाही या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकला पर्याय ठरू शकतील, अशा वस्तूंच्या उत्पादकांचे ६१ स्टॉल्स व महिला बचतगटांचे ५० स्टॉल्सदेखील या प्रदर्शनात असतील, अशी माहिती दिघावकर यांनी दिली. या प्रदर्शनाला मुंबईकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केले आहे.
२३ जूनपासून महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अंतर्गत सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोल व प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरता येणाºया डिस्पोजेबल वस्तू (उदा. ताट, कप, पेले, चमचे, वाटी इत्यादी), हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी प्लॅस्टिकची भांडी-वाट्या इत्यादी वस्तू, द्रवपदार्थ पिण्याचे प्लॅस्टिकचे स्ट्रॉ, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक वा थर्माकोल इत्यादींचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
>सर्वांसाठी विनामूल्य : २२ व २४ जून दरम्यान आयोजित प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधी दरम्यान सर्वांसाठी विनामूल्य आहे. आपले घर, आपली सोसायटी, आपला व्यवसाय व आपल्या परिसरात प्लॅस्टिक बंदी अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पर्यायाने आपली मुंबई अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासह पालिका प्रशासनाने केले आहे.