बारावीनंतर काय?
By admin | Published: May 26, 2015 12:48 AM2015-05-26T00:48:04+5:302015-05-26T00:48:04+5:30
वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेनंतरही पदवी परीक्षा देता येत असल्याने, इंजिनीअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मेडिकलसाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व थोडे कमी झाले आहे.
वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेनंतरही पदवी परीक्षा देता येत असल्याने, इंजिनीअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मेडिकलसाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व थोडे कमी झाले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर आपले करिअर बदलावेसे वाटते. दुसरीकडे प्रवेश परीक्षा असल्या तरीही मूळ परीक्षेचे बारावीचे स्थान वादातीत आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये अनेक उपशाखा बारावीनंतर खुल्या होतात. त्यामुळे बारावीनंतर विद्यार्थ्यांना योग्य दिशा निवडावी लागते. अगदी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरसुद्धा पुढे काय करायचेय हे ठाऊक नसते.
प्रशासकीय सेवा
च्केंद्र शासन आणि राज्य शासन प्रशासकीय सेवांसाठी परीक्षा घेऊन निवड करते. अनुक्रमे यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षा घेते. या परीक्षांसाठी किमान पदवी ही पात्रता असते. अतिशय प्रतिष्ठित आणि जबाबदारीचे असे सक्षम करिअर प्रशासकीय सेवा आपल्याला देते. या परीक्षांना पूर्व आणि मुख्य अशा दोन लेखी आणि नंतर मुलाखत असे स्वरूप असते. परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असते अन् म्हणून अतिशय कठोर परिश्रमांची गरज असते.
च्मराठी मुले या परीक्षांना (विशेषत: यूपीएससी) बसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज केंद्रात तोकडा पडतो. यासाठी प्रशासकीय सेवांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशाच्या आणि राज्याच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला येणे आवडत असेल, तर प्रशासकीय सेवा हे उत्तम दालन तुमच्यासाठी उघडू शकते.
च्बारावीनंतर याचा अभ्यास करणे सुरू करावे. रोज एक उत्तम मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचावे. एखादा उत्तम क्लास करू शकलात तर अधिक चांगले आहे. कारण तिथे जाणकार तुम्हाला मार्गदर्शन करतात. मात्र, तीन वर्षे कसून अभ्यास करा. बरेच विद्यार्थी पदवीनंतर या परीक्षांचा विचार करतात. बाकी सगळे सांभाळून अभ्यास करू असा विचार करतात. ते शक्य नाही. तुमच्याकडे उत्तम वेळ आहे. तुम्ही आत्ताच प्रयत्न सुरू करा, जेणेकरून तुमचा नंतरचा मौल्यवान वेळ वाचेल.
विशिष्ट क्षेत्रातील प्रशासकीय सेवा
याव्यतिरिक्त विशिष्ट क्षेत्रासाठी प्रशासकीय सेवा घेतल्या जातात. जसे इंजिनीअरिंग सेवा, अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र सेवा, मेडिकल सेवा, कृषी सेवा. त्या-त्या क्षेत्रातील पदवीनंतर या सेवांच्या परीक्षा दिल्या जाऊ शकतात. परीक्षेचे स्वरूप वरीलप्रमाणेच असते; मात्र प्रश्न त्या क्षेत्रातील पदवी पातळीचे असतात. या सेवांमध्ये जाऊनसुद्धा उच्चपदस्थ प्रशासकीय पदे मिळू शकतात.
सैन्य भरती
च्सैन्य हे आपल्या संरक्षणाचे माध्यम आहे. महाराष्ट्र हा नेहमीच देशाच्या रक्षणासाठी पुढे राहिला आहे. आपल्या सैन्यात ‘मराठा बटालिअन’ नावाची एक वेगळी बटालिअनसुद्धा आहे. मात्र या क्षेत्रात मराठी मुलांचे प्रमाण नगण्य आहे.
च्प्र्रत्यक्ष फिल्ड (लढाई)वर शिपायांची भरती आठवी पास विद्यार्थ्यांसाठी सुरू होते. बारावीनंतर राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत प्रवेश मिळतो. जानेवारी आणि जुलै अशा दोन सत्रांत प्रवेश होतात. सैन्यात जाण्यासाठी बारावीनंतर तर नौदल आणि वायुदलात जाण्यासाठी विज्ञानातील बारावी गरजेची असते.
कायदा
च्एका सुविद्य समाजाला उत्तम कायदा व्यवस्थेची आवश्यता असते. भारतासारख्या समंजस लोकशाहीत उत्तम कायदा व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कायदा या विषयात चांगले करिअर करता येते.
च्कायद्यासाठी बारावीनंतर पाच वर्षे किंवा पदवीनंतर तीन वर्षांचा कोर्स आहे. बारावीनंतरचा अभ्यासक्रम अधिक दीर्घ आणि उत्तम मानला जातो. बऱ्याच ठिकाणी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात बीए-एलएलबी अशा दोन पदव्या मिळतात.
संपर्क : गव्हर्नमेंट लॉ कॉलेज-चर्चगेट, न्यू लॉ कॉलेज, माटुंगा
सिद्धार्थ कायदा कॉलेज-चर्चगेट, रिझवी कायदा कॉलेज, बांद्रा, मुंबई
महात्मा गांधी कॉलेज, बेलापूर
च्या पदवीबरोबर लेबर लॉ, बौद्धिक संपदा, टॅक्सेशन लॉ, बँकिंग लॉ, फायनान्स, सायबर लॉ असे अल्पमुदतीचे दूरस्थ शिक्षणाचे कोर्सेस पूर्ण करावेत.
विज्ञान तंत्रज्ञान
विज्ञानात विविध विषयांत बीएस्सी आणि नंतर एमएस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत. मुंबईच्या विविध महाविद्यालयांत हे कोर्सेस शिकवले जातात. मात्र याव्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी बीएस्सी, एमएस्सी किंवा बी टेक-एमटेक असा एकत्र कोर्स शिकवला जातो.
मुंबई विद्यापीठात बेसिक विज्ञान, बायोएनलिटीक्स, कॉम्प्युटर सायन्स या विषयात पाच वर्षांचे इंटिग्रेटेड एमएस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत.
च्संपर्क : मुंबई विद्यापीठ-कलिना, सांताक्रुझ, मुंबई
आयआयटी या तंत्रज्ञानातील संस्थेत बीटेक आणि पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमएस्सी हा कोर्स उपलब्ध आहे. त्यासाठी अर्थात आयआयटीची प्रवेश परीक्षा, जेईईची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
च्आयआयटी, पवई, मुंबई
भविष्यातील क्षेत्रे
इतर क्षेत्रांव्यतिरिक्त बायोटेक्नोलोजी, भूगर्भशास्त्र पर्यावरण तंत्रज्ञान, समुद्र तंत्रज्ञान आणि नॅनो टेक्नोलॉजी ही चार क्षेत्रे विकसित होत आहेत. भविष्यात त्यांना प्रचंड मागणी असणार आहे. मुंबई विद्यापीठात समुद्र तंत्रज्ञान आणि विमान बांधणी तंत्रज्ञान या विषयावर बीएस्सी कोर्सेस उपलब्ध आहेत. या कोर्सेसनंतर नौदल आणि वायुदलात उत्तम संधी उपलब्ध होतात. याव्यतिरिक्त आर्किटेक्ट हे एक उत्तम क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्रानंतर नगर विकास विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम करून उत्तम करिअर करता येते. इंजिनीअरिंग केल्यानंतर नोकरी, स्वयंरोजगार याव्यतिरिक्त सरकारी कंत्राटदार म्हणूनही लायसन्स घेता येते.
हॉटेल मॅनेजमेंट
ज्यांना हॉटेलमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट हे फार विस्तीर्ण करिअर आहे. यात प्रतिष्ठा आणि पैसा प्रचंड आहे. फक्त खूप कष्ट करण्याची गरज आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. अनेक अल्पमुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
मास मीडिया
च्तुम्हाला व्यक्त होण्याची संवाद साधण्याची आवड असेल मास मीडिया हे उत्तम करिअर उपलब्ध आहे. तुम्ही बीएमएम हा कोर्स करून पुढे पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा इव्हेंट व्यवस्थापनातील एमबीए हा कोर्स करू शकता. या क्षेत्रामध्ये अपरिमित संधी उपलब्ध आहेत.
समाजसेवा
तुम्हाला समाजसेवा विषयात रस असेल तर मुंबई विद्यापीठात या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेसचे शिक्षण उपलब्ध आहे.
सामाजिक शास्त्रे
तुम्ही आर्ट्सला असाल तर इतिहास, पुरातत्त्व, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण करून नंतर प्रोफेसर पदासाठी उत्तम संधी उपलब्ध होते. अर्थशास्त्र, संख्याशास्त्र करून भारतीय अर्थसेवा आणि संख्यासेवांमध्ये उत्तम संधी उपलब्ध होते.
मेडिकल
च्मेडिकल क्षेत्र हे फार विस्तृत आहे. यात एमबीबीएस करून जनरल डॉक्टर होता येते. बारावीनंतर प्रवेश परीक्षा देऊन मेडिकलला प्रवेश मिळतो. याव्यतिरिक्त दंतवैद्यक शास्त्र हे विकसित होत असलेले शास्त्र आहे. त्यासाठी बीडीएस हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नर्सिंग आणि मेडिकल लॅबोरेटरी या विषयातील पदवी अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत.
खेळ : तुम्हाला मैदानी खेळात रस असेल, तर मुंबई विद्यापीठात खेळ व्यवस्थापन या क्षेत्रातील बीएस्सी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यानंतर याच विषयातील एमबीए काही विद्यापीठात उपलब्ध होतो. याशिवाय फिजिकल एज्युकेशन अर्थात शारीरिक शिक्षण विषयातील पदवीही घेता येते. विविध खेळांसाठीचे फिजिकल ट्रेनर किंवा व्यायामशाळेतील फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर करता येईल.
बारावीनंतरचे
तांत्रिक शिक्षण
च्वास्तविक, तांत्रिक क्षेत्रात जाण्यासाठी दहावीनंतर डिप्लोमा करणे, अधिक सयुक्तिक आहे. मात्र दुर्दैवाने तुमची निवड चुकली असेल तर बारावीनंतर डिप्लोमा करून तुम्ही नोकरी सुरू करू शकता. किंवा त्यानंतर इंजिनीअरिंग निवडू शकता.
डिप्लोमा किंवा आयटीआय
च्जर आर्थिक कारणांमुळे किंवा इतर पुढील शिक्षण घेणे शक्य नसेल तर दोन वर्षांचा आयटीआय किंवा तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय आहे. डिप्लोमानंतर शासकीय संस्था, आस्थापने आणि खासगी कंपन्यांमध्ये अनेक संधी उपलब्ध होतात. रेल्वे आणि अनेक केंद्र शासकीय आस्थापनामधील संधी मराठी मुले घेत नाहीत. वास्तविक, उत्तम करिअर आणि पैसा या नोकऱ्यांमध्ये मिळू शकतो तसेच अनुभावापरत्वे पुढे बढती मिळणे शक्य असते.
व्यवस्थापनशास्त्र
व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्र हा परवलीचा शब्द झाला आहे. सध्या खूप संस्था या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्थात एमए, बीए कोर्ससाठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे, मात्र या विषयात पुढे करिअर करायचे असेल तर बीएमएस हा कोर्स करता येऊ शकतो.
बँक आणि विमा
भारतातील बँकिंग आणि आर्थिक व्यवहार क्षेत्र प्रचंड वाढत आहे. भारतातील बँका सक्षम आहेत आणि बँकिंग व्यवस्था विकसित आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरला खूप वाव आहे. मुंबई विद्यापीठाने बँकिंग आणि विमा क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम सुरू केला असून, तो अनेक विद्यापीठांत उपलब्ध आहे. तसेच आर्थिक सेवाक्षेत्र या विषयातदेखील पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरू केला आहे.
गुंतवणूक सल्लागार
सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर
आपल्या देशातील अर्थव्यवस्था, गुंतवणूक व्यवस्था आणि आर्थिक व्यवहार वाढत आहेत. सामान्य लोकांकडे अधिक पैसा येत आहे आणि त्यांची गुंतवणुकीबद्दलची आस्था आणि सजगता वाढत आहे. अशा वेळेस गुंतवणूक सल्लागाराची गरज वाढत आहे, यासाठी एफपीएसबी या शासकीय संस्थेने सीएफपी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. गुंतवणुकीच्या विविध माध्यमाचे प्रशिक्षण दिले जाते. सर्व अभ्यासक्रम झाल्यावर सीएफपी ही व्यावसायिक पदवी मिळते.
च्सीएफपी हे स्वयंरोजगारासाठी एक उत्तम साधन आहे.
सीए/सीएस/आयसीडब्ल्यूए
कॉमर्समधील विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर हे तीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अकाउंट्समध्ये करिअर करायचे असेल, तर चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट हे दोन कोर्सेस आणि कंपनी कायद्यातील प्रावीण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हा कोर्स उपलब्ध आहे. बारावीनंतर साधारण पाच वर्षांमध्ये हे कोर्सेस पूर्ण करता येतात. या कोर्सेसनंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
संपर्क
च्सीए इन्स्टिट्यूट : कफ परेड, मुंबई
च्सीएस इन्स्टिट्यूट : नरिमन पॉइंट, मुंबई
च्कॉस्ट अकाउंटंट इन्स्टिट्यूट : फोर्ट, मुंबई