मुंबईत आगीच्या सत्राचे कारण काय? समितीने मागविली श्वेतपत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:52 AM2018-12-29T03:52:35+5:302018-12-29T03:52:50+5:30
गेल्या महिन्याभरात मुंबईत सुरू असलेल्या आगीच्या सत्राने नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे. अंधेरी येथील कामगार रुग्णालय, कांदिवली येथे कपड्यांचे दुकान व चेंबूर येथे उत्तुंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीने आतापर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईत सुरू असलेल्या आगीच्या सत्राने नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे. अंधेरी येथील कामगार रुग्णालय, कांदिवली येथे कपड्यांचे दुकान व चेंबूर येथे उत्तुंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीने आतापर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटले. मुंबईत वाढत्या आगीचे कारण काय? दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशा घटना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
चेंबूर येथे इमारतीला लागलेल्या आगीत पाच नागरिक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय सदस्यांनी पालिका प्रशासनाला फैलावर घेतले. या घटनांना जबाबदार पालिका, आरोग्य, परवाना, इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाºयांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले. पालिका प्रशासन व अग्निशमन दल आदी यंत्रणांनी वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास मुंबईत भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या प्रकरणी महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सदस्यांनी केली. विविध दुर्घटना घडून नागरिकांचे नाहक बळी गेले तरी अधिकाºयांवर का कारवाई होत नाही? या दुर्घटना रोखण्यासाठी पालिका उपाययोजना करीत नसल्याने आम्ही दरवेळी काय मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमायचे का, असा सवाल राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करीत स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. पुढच्या बैठकीत पालिका प्रशासन मुंबईत लागणाºया आगी व उपाययोजनांबाबत श्वेतपत्रिका काढणार आहे.
अग्निशमन दलाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना?
सरगम टॉवरच्या रहिवाशांनी जानेवारी २०१८ मध्येच या इमारतीतील अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करण्याची विनंती स्थानिक अग्निशमन दल केंद्राकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच ही मोठी दुर्घटना घडली व त्यात पाच जणांचा बळी गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.