मुंबई - टोल नाक्यावरील पिवळया रेषेच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नियमांचे पालन न करता टोल वसुली करणा-या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करु असे त्यांनी सांगितले. टोल नाक्यावरील पिवळया रेषेचा नियम टोल वसुली करणारे कर्मचारी अजिबात जुमानत नसल्याचे समोर आले आहे. टोल नाक्यापासून काही अंतरावर एक पिवळी रेषा आखली जाते. वाहनांची रांग जर त्या पिवळया रेषेबाहेर जात असेल तर टोल वसुली करु नये असा नियम आहे. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीमधून नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारने हा नियम बनवला.
आज मुंबई-पुण्यातील सर्वच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती आहे. वाहनांच्या रांगा पिवळया रेषेबाहेर जाऊनही टोल वसुली सर्रास सुरु असल्याचे चित्र आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने टोल वसुली कर्मचा-याला या नियमाची आठवण करुन दिल्यानंतर शासनाचा असा कुठला जीआरच नसल्याचे त्याने सांगितले.
सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टयांमुळे मुंबईकर मोठया संख्येने शहराबाहेर जात आहेत. पण टोल नाक्यावरील कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
काय म्हणाले एकनाथ शिंदे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना जो त्रास होतोय तो लवकरात लवकर दूर करु. मी यातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन न करता टोल वसुली करणा-या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करु. लवकरच तुम्हाला टोल नाक्यावरील स्थिती सुरळीत झालेली दिसेल असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीच काही महिन्यांपूर्वी पिवळया रेषेच्या नियमांची माहिती दिली होती.
टोल वसुली विरोधात मनसेचे आंदोलन मनसे कार्यकर्ते निघून जाताच पुन्हा एकदा ऐरोली टोल नाक्यावर टोल वसुली सुरु झाली आहे. मुंबई बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याच्या बातम्या आल्यानंतर मनसे कार्यकर्ते शनिवारी सकाळी मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर पोहोचले व टोल वसुली बंद पाडली. मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: टोल नाक्यांवर उभे राहून वाहतूक कोंडी फोडली व टोल न घेता गाडया सोडल्या. पोलीस दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा टोल वसुली सुरु झाली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळची सुट्टी आहे त्यामुळे पुढचे चार दिवस टोल वसुली करु नये असे पत्र मनसे कार्यकर्त्यांनी टोल वसुली करणा-या कंपनीला दिले आहे.