शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बॉलीवूड गप्प का ?
By admin | Published: September 14, 2015 03:11 AM2015-09-14T03:11:43+5:302015-09-14T03:11:43+5:30
महाराष्ट्रातील शेतकरी सलग दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारांनी सामाजिक भान ठेवत शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी सलग दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारांनी सामाजिक भान ठेवत शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अर्थात अशीच मदतीची अपेक्षा बॉलीवूडमधील कलाकारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेने बॉलीवूडच्या कलाकारांना दिला आहे. अर्थात मनसेच्या या भूमिकेचेही समर्थन करता येऊ शकत नाही.
कोट्यवधींची कमाई करणारे बॉलीवूडचे कलाकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीच मदत का करू शकत नाहीत? एकीकडे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना बॉलीवूडचे मोठे कलाकारही गप्प आहेत. या विषयावर ते काही भाष्य करीत नाहीत. ज्या राज्यातील जनतेने या कलाकारांना एवढा मानसन्मान दिला आणि आजही देत आहेत, त्या राज्यातील शेतकरी अडचणीत असताना त्यांच्यासाठी काहीच करावेसे वाटू नये, अशा अनेक प्रश्नांकडे डोळेझाक करून कसे चालेल?
देशात कोठेही संकट ओढवले तर बॉलीवूडचे कलाकार मदत करण्यासाठी पुढे सरसावतात, हा बॉलीवूडचा इतिहास आहे. भूकंप, पूर अथवा अन्य कोणत्याही आपत्तीच्या काळात हे कलाकार मदतीचा हात देतात. अनेक कलाकार गरीब, गरजूंना मदत करतात, मात्र आपले नाव समोर येऊ देत नाहीत़ परंतु आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसताना हे बडे कलाकार गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारही कोणत्याही आपत्तीत बॉलीवूड कलाकारांना मदत करण्याचे आवाहन करते; पण शेतकऱ्यांना मदत देण्याच्या बाबतीत राज्य सरकारने या कलाकारांना काही आवाहन केले आहे का, ही बाब अद्याप अस्पष्टच आहे. राज्य सरकारच्या आवाहनानंतरही जर कलाकार मदत करीत नसतील तर ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मनसेसारख्या पक्षांनी जे आव्हान दिले आहे त्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे कलाकारांनी सढळ हस्ते मदत करावी अन्यथा मनसेच्या आंदोलनाची शैली ज्यांना माहीत आहे त्यांना हे सांगण्याची गरज नाही की कोणत्या कलाकारावर काय वेळ येऊ शकते. मात्र अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, की मोठे कलाकार अशी वेळ येऊ देणार नाहीत.