राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याबाबत चिंता व्यक्त करीत उच्च न्यायालयाने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत, याची माहिती राज्य सरकारला देण्याचे निर्देश राज्य सरकारला बुधवारी दिले.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत १९ मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यात लहान मुले अधिक असुरक्षित असू शकतात. त्यामुळे प्रशासनाने पायाभूत सुविधा बळकट कराव्यात, असे न्यायलयाने म्हटले.
दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी एप्रिल २०२१ पासून ० ते ९ वर्षे या वयोगटातील १०,५२४ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १७ मुलांचा मृत्यू झाला, तर १० ते १० वर्षे वयोगटांतील २६,३२८ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ३३ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला बालरोग तज्ज्ञ आणि अन्य महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून मुलांसाठी व त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कशा बळकट करण्यात येतील याची खात्री करा, असेही न्यायालयाने म्हटले.
मुलांची काळजी त्यांची आई घेते. त्यामुळे त्यांच्या आईसाठी किंवा अन्य कोणी काळजी घेणारी असेल तर त्या व्यक्तीची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करा. यासाठी काय करता येईल, यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश न्यायालयाने सरकारला व पालिकेला दिले.