उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ९ मे पर्यंत मुंबईत १२,००० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. आतापर्यंत १७ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर न्यायालयाने मुलांवर वेळेत व पुरेसे उपचार करण्यासाठी काय करण्यात येते, असा प्रश्न पालिकेला केला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आरोग्यासंबंधी सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या आहेत. तसेच मुलांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. आता सध्या केवळ दोनच मुले कोरोनावर उपचार घेत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र खाटा ठेवल्या आहेत. त्यांच्यावर पुरेसे उपचार करण्यात येत आहेत, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच मुलांचे पालक किंवा त्यांचे काळजीवाहू यांच्यासाठीही सोय केली आहे. त्यांनी लस घेणे आवश्यक आहे, असेही साखरे यांनी म्हटले. पालिकेच्या वार्षिक महसुलातील १२ टक्के महसूल आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात आला आहे, अशीही माहिती साखरे यांनी दिली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, १२ मे च्या सुनावणीत ११००० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. आता ही आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मुलांवर पुरेसे व वेळेत उपचार करण्यासाठी काय करता येईल?
दरम्यान न्यायालयाने मुंबई महापालिकेचे पॅटर्न राज्यातील सर्व महापालिकांनी राबवावे, अशी पुन्हा एकदा सूचना केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी राज्यातील सर्व पालिकांच्या आयुक्तांबरोबर व्हीसीद्वारे बैठक का घेतली नाही? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला.
मुंबईचे यशस्वी मॉडेल राज्यातील सर्व पालिकांपर्यंत पोहचावे, हीच आमची इच्छा आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २ जून रोजी ठेवली.