मुंबई - ससंदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यानंतर, फडणवीस यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सुनावले. लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे हे अत्यंत अयोग्य आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणे सांगत आहेत ती हास्यास्पद आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले. फडणवीसांच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
''देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेईमानांना मांडीवर घेतलं नव्हतं. गद्दारांना लाथा घालून हाकलून द्या असं सांगितलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय त्यांच्यावर वेळ आलीये ही'', असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांना फटकारलं. तसेच शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. ''फडणवीसांना काहीही बोलू द्या. बाळासाहेबांनी कधीही व्यक्तींना विरोध केला नाही. काही भूमिकांना विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ आमच्यावर अजून आलेली नाही'', असं राऊत यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंना कोण नेतंय - फडणवीस
उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, अशा शब्दात फडणवीसांनी बोचरी टीका केली. यावेळी, एकनाथ शिंदे यांनी मान हलवत बरं म्हणून फडणवीसांच्या उत्तराला हसत-हसत दाद दिली. तसेच, उद्धव ठाकरेंना जी जागा दिली होती, तिथे ते जात नाहीत. विधानपरिषदेचे सदस्य आहेत, २ तास जाऊन तिथे बसत नाहीत. मग, त्यांना कोण लोकसभेत बोलावणार आहे, कोण पार्लमेंट हाऊसमध्ये बोलावणार आहे?, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची एकप्रकारे खिल्ली उडवली.