करायचे काय? डॉक्टरच ॲप्रन घालत नाहीत..! आता शासकीय मेडिकल कॉलेजांत ॲप्रनसक्ती लागू
By संतोष आंधळे | Updated: February 22, 2025 02:20 IST2025-02-22T02:20:43+5:302025-02-22T02:20:58+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेशच काढले आहेत.

करायचे काय? डॉक्टरच ॲप्रन घालत नाहीत..! आता शासकीय मेडिकल कॉलेजांत ॲप्रनसक्ती लागू
संतोष आंधळे
मुंबई : डॉक्टर असो वा वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांना ॲप्रन घालणे बंधनकारक आहे. मात्र, सार्वजनिक रुग्णालयांत हा नियम सर्रास पायदळी तुडविला जातो. हे पाहून आता सरकारने अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना ॲप्रन घालणे बंधनकारक केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेशच काढले आहेत.
मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशी ४२ काॅलेजांमध्ये ७,७८७ विद्यार्थी आहेत. तर २,५६४ अध्यापक आहेत. बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतील अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी ॲप्रन न घालताच रुग्णालयात वावरतात. आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम नाही. मात्र, अनेकजण त्याचे पालन करत नाहीत.
ॲप्रन का घालावा?
ॲप्रनमुळे डॉक्टर, अन्य कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक यामधील फरक स्पष्ट होतो. ते रुग्णांच्या दृष्टीनेही सोयीस्कर ठरतो.
ॲप्रन न घातल्याने जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.
मेडिकल कॉलेजेसशी संलग्न रुग्णालयांत ॲप्रन घालणे
गरजेचे आहे. अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर आणि एमबीबीएस अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी सगळ्यांनीच
ॲप्रन घालणे गरजेचे आहे. या संदर्भातील आदेश संबंधितांना
देण्यात आले आहेत.
हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग
डॉक्टरांनी ॲप्रन घातल्यामुळे रुग्णांचा त्यांच्या प्रति आदर वाढतो. विद्यार्थ्यांनी एकाच पद्धतीचा ॲप्रन घातल्याने एकसूत्रता राहते. विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव राहत नाही. ॲप्रनमुळे जीवजंतूंपासून सुरक्षितता प्रदान होते.
डॉ. माधुरी कानिटकर,
कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
मी स्वतः डीन असताना नेहमी ॲप्रन घालून बसत असे. अध्यापक, निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी ॲप्रन घालावेत असे संकेत अनेक वर्षांपासून आहेत. वैद्यकीय व्यवसायात काम करताना काही नियम, शिस्त यांचे पालन करणे अपेक्षित आहे.
डॉ. प्रवीण शिनगारे, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय