Join us

नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज नाकारल्यास काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:45 AM

India-USA: तुमचा अर्ज इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट (आयएनए) च्या कलम २१४ (बी) किंवा कलम २२१ (जी) अंतर्गत नाकारला गेला आहे का, यावर उत्तर अवलंबून आहे.

प्रश्न - माझा नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज नाकारला गेला आहे. तो का नाकारला गेला असेल? आणि मी पुन्हा अर्ज करू शकतो का ?उत्तर - तुमचा अर्ज इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट (आयएनए) च्या कलम २१४ (बी) किंवा कलम २२१ (जी) अंतर्गत नाकारला गेला आहे का, यावर उत्तर अवलंबून आहे. जर तुमचा व्हिसा अर्ज आयएनए, कलम २१४ (बी) अंतर्गत नाकारला गेला असेल, तर तुम्ही नॉन-इमिग्रंट व्हिसाच्या ज्या श्रेणीसाठी अर्ज केला आहे त्यामध्ये तुम्ही कसे पात्र होता, याची पुरेशी माहिती कौन्सुलर अधिकाऱ्याला दिलेली नसेल किंवा इमिग्रंटच्या हेतूबद्दल असलेल्या शंकांचे समाधान केले नसेल. इमिग्रंटच्या हेतूचे समाधान करणे याचा अर्थ, तुमच्या देशाशी तुमचा घट्ट संबंध आहे, हे प्रदर्शित करणे. तसेच, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्यानंतर तुम्ही परतणार आहात, हे व्यवस्थित मांडणे. तुम्ही पुन्हा अर्ज कधी करू शकता, या संदर्भात काही ठोस नियम अथवा धोरण नाही. परंतु, तुमच्या पहिल्या अर्जाच्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे घडत नाही, तोवर तुम्ही प्रतीक्षा करणे फायद्याचे ठरू शकते. तुमच्या प्रवासाचा हेतू आणि तुमच्या प्रवासाअंतर्गत असलेला तुमचा प्लॅन हा तुम्ही निवडलेल्या व्हिसा श्रेणीमध्ये बसतो का, याचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. ज्या अर्जदारांनी चुकीच्या व्हिसा श्रेणीअंतर्गत अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा योग्य श्रेणीमध्ये अर्ज करता येतो. मात्र, पात्र होण्यासाठी तुमचा हेतू समाधानकारकरित्या पटवून द्यायला हवा. तुमच्या व्हिसा अर्जामध्ये संपूर्णपणे खरेपणा हवा. तुमचा डीएस-१६० हा अर्ज सादर करण्यापूर्वी तो बारकाईने तपासावा. त्यात चूक, खोटी माहिती किंवा काही वगळले गेले नाही ना, तसेच ज्या मुद्द्यावर तुमच्या अर्जाची छाननी होऊ शकते, त्याची पूर्तता केली आहे अथवा नाही, हे बारकाईने तपासावे. कौन्सुलर अधिकाऱ्याला ‘योग्य’ उत्तर देण्यापेक्षा ‘खरे’ उत्तर द्यायला विसरू नका. २१४ (बी) अंतर्गत व्हिसा नाकारला गेला असेल आणि पुन्हा अर्ज केला असेल तर व्हिसा मिळेलच, याची शाश्वती नाही. जेव्हा तुम्ही पुन्हा अर्ज करता तेव्हा नव्याने अर्ज द्यावा लागतो. तसेच नव्याने शुल्क भरावे लागते. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी कायद्यानुसार, तुम्ही निवड केलेल्या व्हिसा श्रेणीतील सर्व निकषांची पूर्तता करून पात्र व्हावे लागते.    तुमचा नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज जर कलम २२१ (जी) अंतर्गत नाकारला गेला असेल, तर तुम्ही पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. कारण, आम्ही ते प्रकरण प्रशासकीय पातळीवर हाताळत असतो. प्रशासकीय पातळीवर हाताळणे याचा अर्थ, कौन्सुलर अधिकारी तुमच्या अर्जाची पुनर्पडताळणी करत आहे.    जर तुमच्याकडे अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्यात आली, तर ती वेळेवर सादर करावीत. त्यामुळे तुमच्या व्हिसा अर्जावर काम करणे सुरू राहील. जर अधिक माहिती हवी असेल तर कौन्सुलर सेक्शन तुमच्या संपर्कात राहील. तुमच्या अर्जाचे रियल-टाईम स्टेटस तुम्हाला https:// ceac. state.gov/CEAC/. येथे समजू शकेल.

टॅग्स :भारतअमेरिकाव्हिसापासपोर्ट