मुंबई :मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, बीएमसीचे अधिकारी आणि स्थानिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. दरम्यान आता या जलाशयाच्या पुनर्बाधणीसाठी जी कार्यपद्धती स्वीकारली जाणार आहे, त्याबाबत नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी त्यांच्या सूचना कळवाव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. सूचनांसाठी पालिकेने ई मेल आयडी (mhriit.suggestion@gmail.com) दिला असून १५ दिवसांच्या आत नागरिक आणि तज्ज्ञांना आपल्या सूचना यावर पाठवायच्या आहेत. दरम्यान जलाशयासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, असे पत्र पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यापूर्वीच आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना लिहिलेले आहे.
पाण्याची गळती ही चिंतेची बाब :
मलबार हिल परिसरात पालिकेचे तब्बल १३६ वर्षे जुने जलाशय असून या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. जलाशयातून मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती ही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे पालिकेने मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पुनर्रचनेच्या प्रस्तावामुळे ३८९ झाडे प्रभावित होत आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आहे. ही झाडे तोडणे टाळण्यासाठी अन्य पर्याय शोधण्याची त्यांनी मागणी केली आहे.
नागरिक, पर्यावरण प्रेमींची मागणी :
समितीचा अहवाल येईपर्यंत नवीन जलाशयासाठी सध्या सुरू असलेली सर्व कामे स्थगित करण्यात यावीत, झाडांवर लावण्यात टॅग काढून टाकावेत. प्रस्तावित जागेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेली बेदखल नोटीस मागे घेण्यात यावी, संबंधित अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे. पालिकेने जलाशयासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमी करत आहेत.