"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:02 AM2024-02-26T11:02:15+5:302024-02-26T11:03:56+5:30
अंतरवालीतील पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले होते. मात्र, भांबेरी गावात त्यांचा मुक्काम झाला.
मुंबई - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही त्यांनी केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, मला मारण्याचं कारस्थान करण्यात आल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिले. फडणवीसांनी जरांगेंचे आरोप फेटाळले असून त्यांचा बोलावता धनी कोण, हे आम्हाला माहिती, असेही त्यांनी म्हटले होते. आता, जरांगेंची पाठराखण करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना राजीनामा मागितला आहे.
अंतरवालीतील पत्रकार परिषदेनंतर जरांगे मुंबईकडे निघाले होते. मात्र, भांबेरी गावात त्यांचा मुक्काम झाला. आज सकाळी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत, सागर बंगल्याकडे जाण्यासंदर्भात लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. सगेसोयरे अध्यादेशापासून फडणवीसांची सुट्टी नाही, असेही जरांगे यांनी म्हटले. जरांगेंच्या या आक्रमक पवित्र्यांसदर्भात खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून फडणवीसांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे.
यामागचा बोलवता धनी कोण हे जर गृहमंत्र्यांना माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहे का?, असा सवाल करत राऊत यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच, जरांगेंची भाषा ही भाजपची भाषा आहे, त्यांची भाषा ही गावाकडची भाषा आहे. त्यामुळे, जरांगेंच्या भाषेकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या भावना लक्षात घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी जरांगेंची पाठराखण केली.
जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत पोहचले
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली होती. अंतरवाली सराटीतून भांबेरीपर्यंत गेले असून, रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर, आज सकाळी जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी गावात येऊन आंदोलनस्थळ गाठले. तसेच, पुढील काही तासांत मुंबईला जाण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
आंदोलकांनी बस जाळली
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याच बरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे एक बस (क्रमांक एम एच १४- बी टी १८२२) जाळण्यात आली आहे. त्यानंतर, पुढील १० तासांसाठी बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.